विक्रीकर बुडविणाऱ्यांविरुद्ध गुन्ह

By Admin | Updated: March 11, 2015 00:32 IST2015-03-11T00:17:48+5:302015-03-11T00:32:37+5:30

उद्योजग, व्यापारी हवालदिल : विक्रीकर विभागाची धडक मोहीमे

Crime against dacoity | विक्रीकर बुडविणाऱ्यांविरुद्ध गुन्ह

विक्रीकर बुडविणाऱ्यांविरुद्ध गुन्ह

एकनाथ पाटील -कोल्हापूर -उद्योग सुस्थितीत चालत असतानाही विक्रीकर बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ही रक्कम एक कोटीपेक्षा जास्त असल्याने विक्रीकर विभागाच्यावतीने मार्चअखेरीमुळे करचुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून वसुलीची धडक मोहीम उघडण्यात आली आहे. या कारवाईच्या धसक्याने अनेक उद्योजक व व्यापाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.
मूल्यवर्धित कराच्या (व्हॅट) वसुलीचे काम विक्रीकर विभाग करतो. विक्रीकर कायद्यानुसार उद्योजक व व्यापाऱ्यांना महिना, तीन किंवा सहा महिन्यांनी करदायित्वानुसार विवरणपत्र भरणे व भरलेल्या विवरणपत्रानुसार कराची रक्कम शासकीय कोषागारात जमा करणे बंधनकारक आहे; परंतु उद्योग सुस्थितीत चालत असतानाही काही व्यापारी या नियमांचे उल्लंघन करून कर व विवरणपत्र भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. शासनाकडून विक्रीकर विभागाला चालू वर्षी जिल्ह्यातून तब्बल ८५३.४१ कोटी कर जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी विक्रीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगलाच चंग बांधला असून, त्यांनी करवसुलीचे विभागवार प्लॅनिंग केले आहे.
गेली दहा-अकरा महिने व्यापारी व उद्योजकांना समजुतीची भूमिका घेत विवरणपत्र व त्यानुसार कर भरण्यासाठी प्रवृत्त केले जात होते; परंतु त्यांनी याचे गांभीर्य लक्षात न घेता कराचा भरणा केला नाही.
आर्थिक वर्ष संपत आल्याने या विभागाने कडक भूमिका घेतली आहे. कर न भरणाऱ्यांवर थेट संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मूल्यवर्धित कर कायदा २००२ च्या कायद्यानुसार विवरणपत्र दाखल न करणाऱ्या तसेच कर न भरणाऱ्या उद्योजक व व्यापाऱ्यांवर अभियोग दाखल करण्याची तरतूद आहे. त्यानुसार बुडव्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची सुरुवात झाली आहे.
तब्बल ८७ लाख ३२ हजार ८६८ रुपये कर भरला नसल्याचे निदर्शनास येताच ताराबाई पार्क येथील हरदेव स्टीलचे मालक सदरूमल एन. नागदेव यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर ४९ लाख ४३ हजार ९०० एवढ्या कराच्या थकबाकीपोटी युनायटेड थर्मो कोस्टस, हातकणंगले या कंपनीवरही हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विक्री कर विभागातर्फे कारवाईची व्याप्ती वाढविण्यात येणार असून कसूरदार व्यापाऱ्यांना नोटिसा बजाविण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.


विवरणपत्र व त्यानुसार कर भरणे कायद्याने बंधनकारक आहे. कायद्यानुसार न वागणाऱ्या उद्योजक व व्यापाऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी तत्काळ कर भरणा करावा.
- सुशीलकुमार शेळके, विक्रीकर उपायुक्त (विवरण व वसुली शाखा)

Web Title: Crime against dacoity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.