कळंबा तलाव भरला, पाणी सांडव्यावरुन वाहू लागले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 03:55 PM2019-07-29T15:55:59+5:302019-07-29T16:00:23+5:30
कळंबा : जुलैच्या पंधरवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने अवघी तीन फूट पाणीपातळी असणारा कळंबा तलाव यंदा पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ...
कळंबा : जुलैच्या पंधरवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने अवघी तीन फूट पाणीपातळी असणारा कळंबा तलाव यंदा पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहू लागला आहे. तलावाची पाणीपातळी सत्तावीस फुटांवर गेली आहे.
गेल्या आठवड्यातील मुसळधार व समाधानकारक पावसाने कात्यायनी टेकड्यात उगम पावलेल्या जयंती नदीसह तलावाचे मुख्य जलस्तोत्र असणारे सातही नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने सकाळी कळंबा तलावाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होऊन पाणी सांडव्यावरून वाहू लागले आहे.
तलावाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने मनोऱ्यावरून भरलेल्या तलावाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. तलावाची पाणीपातळी सत्तावीस फुटांवर गेली की तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्या वरून ओसंडून वाहतो येत्या काहीं दिवसात मुसळधार पाऊस बरसल्यास पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने तलावातील पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहू लागले आहे. तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने कळंबा पाचगाव व उपनगरातील नागरिकांची यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही.
हुल्लडबाजाना आवरा
भरलेल्या कळंबा तलावातील पाणीसाठा पाहण्यासाठी महिला व युवती तलावावर येत असून तलावालगत गाड्या लावून तरुणांचे टोळके हुल्लडबाजी करत असते तर मद्यपी प्रेमी व युगलांचे अश्लील चाळे यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. कळंबा तलावाशेजारी करवीर पोलिस स्टेशनची पोलिस चौकी असून पोलिसांनी हुल्लडबाजांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
पाण्याच्या नियोजनाची गरज
यंदा पावसाळ्यापूर्वी तलावात फक्त तीन फूट डेड वॉटर अर्थात मृत पाणीसाठा शिल्लक होता पावसाने हुलकावणी दिली असती तर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असती आज समाधानकारक पावसाने पाणीसाठ्यात वाढ झाली असली तरी पालिका प्रशासनाने यंदा तरी कळंबा पाचगाव व उपनगरातील पाणीवाटपाचे योग्य नियोजन करणे क्रमप्राप्त आहे.