कोरोना हटवण्याचे श्रेय कोल्हापूरच्या जनतेचे : जिल्हाधिकारी देसाई : गुरुबाळ माळी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:13+5:302020-12-13T04:39:13+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरातून कोरोना हटविण्यासाठी शासकीय यंत्रणांसह अनेक संस्था, संघटना जरूर राबल्या; परंतु तरीही त्याचे खरे श्रेय कोल्हापूरच्या जनतेचेच ...

कोरोना हटवण्याचे श्रेय कोल्हापूरच्या जनतेचे : जिल्हाधिकारी देसाई : गुरुबाळ माळी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर : कोल्हापुरातून कोरोना हटविण्यासाठी शासकीय यंत्रणांसह अनेक संस्था, संघटना जरूर राबल्या; परंतु तरीही त्याचे खरे श्रेय कोल्हापूरच्या जनतेचेच आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी येथे केले. ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांच्या ‘कोरोना अनलॉक’ या पुस्तकाचे प्रकाशन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना लसवाटपाचे राज्य शासनाने तीन टप्प्यांत नियोजन केले असल्याचे यड्रावकर यांनी सांगितले. येथील राम गणेश गडकरी सभागृहात हा कार्यक्रम झाला. त्यास कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, भूजल सर्व्हेक्षण संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोनाच्या काळात आम्ही लोकांना प्रशासन म्हणून फक्त दिशा दाखवली. गावपातळीवर ज्या समित्या स्थापन झाल्या त्यांनी उत्तम काम केले. त्यामुळेच विशिष्ट टप्प्यावर संसर्गाचा वेग आम्ही रोखू शकलो. अन्य जिल्ह्यात वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हायला खूप दिवस लागले; परंतु कोल्हापुरात हा दर एकदम खाली आला व तो तसाच कायम राहिला. सध्या संसर्गाचा व मृत्यूचाही दर राज्यात कोल्हापूरचा कमी आहे.
राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, कोरोनाच्या संकटात कोल्हापूरने एकजुटीने लढा दिला. आता लसीकरणाचे आव्हान आहे. शासनाने त्याचे तालुकास्तरांपर्यंतचे नियोजन केले आहे. या संकटात शासनाची आरोग्य यंत्रणाच लोकांच्या मदतीला धावून आली. जे लोक कायम सीपीआर रुग्णालयाला दोष देत होते, त्यांनाच तिथे उपचार घ्यावे लागले.
डॉ. कलशेट्टी व कुलगुरू शिर्के यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक रोकडे, मिलिंद धोंड, बंटी सावंत, जाफरबाबा सय्यद, संताजी घोरपडे, संतोष निंबाळकर यांचा कोरोना योद्धे म्हणून सत्कार करण्यात आला. गुरुबाळ माळी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शशिकांत चौधरी यांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली. उद्धव गोडसे यांनी सूत्रसंचलन केले. विजय केसरकर यांनी आभार मानले.
खासगी डॉक्टरांचे सहकार्य
राज्यभरात खासगी डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत नाहीत म्हणून गुन्हे दाखल करावे लागले; परंतु कोल्हापुरात प्रशासनाला त्यांचे चांगले सहकार्य लाभल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी नमूद केले.
१२१२२०२०-कोल-गुरुबाळ माळी बुक
कोल्हापुरात शनिवारी ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांच्या ‘कोरोना अनलॉक’ पुस्तकाचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख हस्ते प्रकाशन झाले. यावेळी विजय केसरकर, डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, विद्या माळी, प्राचार्य जी. पी. माळी, अमेय जोशी व्यासपीठावर उपस्थित होते (आदित्य वेल्हाळ)