मदतीसाठी अंधांकडून ‘आॅर्केस्ट्रा’ची निर्मिती
By Admin | Updated: August 12, 2014 00:40 IST2014-08-12T00:34:36+5:302014-08-12T00:40:40+5:30
अंधांसाठी वसतिगृह : क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील अंध युवक मंचचा उपक्रम

मदतीसाठी अंधांकडून ‘आॅर्केस्ट्रा’ची निर्मिती
कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे अंध युवक मंच, हणबरवाडी संचलित अंधांसाठीचे वसतिगृह चालविले जाते. विशेष म्हणजे अंधांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे, याकरिता अंधांनी अंध युवक-युवतींसाठी हे वसतिगृह चालविले आहे. मात्र, या वसतिगृहास शासकीय अनुदान नसल्याने या युवक मंचने आॅर्केस्ट्रा व बेंजो पार्टीची निर्मिती केली आहे. हा वाद्यवृंद गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात सादर करून मदत मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी माहिती अंध युवक मंचचे अध्यक्ष संजय ढेंगे यांनी आज, सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
२००७ साली अंध युवक मंचची स्थापना करण्यात आली. यामध्ये अंधांनी अंधांसाठी २५ जणांचे वसतिगृह क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे सुरू केले आहे. या वसतिगृहामध्ये २५ विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली आहे. हे विद्यार्थी विकास विद्या मंदिर, गोपाल कृष्ण गोखले कॉलेज, डी. डी. शिंदे सरकार कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी येणारा खर्च समाजातील दानशूर व्यक्तींकडून येणाऱ्या मदतीवरच केला जात आहे. त्यामुळे ही मदतही अपुरी पडू लागली आहे. संस्थेचे सदस्यच आपल्या घरच्यांकडून व प्रसंगी खिशातून खर्च भागवत आहेत. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात आपल्या अंध बांधवांकडे असणारी कला सादर करून त्यातून येणाऱ्या पैशांवर वसतिगृहाचा गाडा चालविण्याचा मानस या युवक मंचाकडून केला आहे. त्यादृष्टीने मंचाने नवरंग आॅर्केस्ट्रा व बेंजो पार्टीची निर्मिती केली आहे. ज्या मंडळांना गणेशोत्सव मिरवणुकीसाठी अंध युवक मंचला आमंत्रित करावयाचे आहे. त्यांनी मंचच्या संजय ढेंगे किंवा बशीर शेख यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.