कोल्हापूर : कर्जदार अशोक सावंत व सहकर्जदार प्रेमानंद सावंत यांनी पार्श्वनाथ सहकारी बँकेकडून शेती व शेती अनुषंगिक व्यवसायासाठी ८० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे परंतु आता ते कर्ज फेडायचे नसल्याने ते बनाव रचत असल्याचे म्हणणे बँकेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. ‘लोकमत’मध्ये २ व ३ डिसेंबरला या कर्जप्रकरणाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
बँक म्हणते, नाटळ (हुमलेटेंबवाडी, ता.कणकवली) येथील सात एकर १२ गुंठे जमीन तारण ठेवून या दोघांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे. या कर्जास सत्यवान तुकाराम तांबे, नंदकुमार विलास जामसांडेकर हे जामीनदार आहेत. कर्जाच्या सर्व प्रकरणांवर प्रेमानंद सावंत यांच्या सह्या आहेत. त्यांनी या कर्जास आपली जमीन तारण गहाण दस्त नं ४१० -२०१६ दि २० फेब्रुवारी २०१६ अन्वये तारण दिली आहे. त्यांनी वचनचिठ्ठीही लिहून दिली आहे. त्यावरही त्यांच्या सह्या आहेत. प्रेमानंद सावंत हे सुशिक्षित असून त्यांनी त्यातील मजकूर न वाचताच इतरांच्या तोंडी सांगण्यावरून सह्या केल्या, ही बाब अनाकलनीय आहे. कर्जाची थकबाकी झाल्यावर त्यांना नागरी सहकारी बँक असोसिएशनतर्फे थकीत कर्जाच्या वसुलीसाठी नोटीस बजावली. त्या नोटिसीलाही त्यांनी म्हणणे दिलेले नाही. त्यांना सुनावणीसाठी पुरेशी संधी दिली परंतु ते त्यास हजर राहिले नाहीत आणि आता खोट्या तक्रारी करत आहेत. प्रेमानंद सावंत यांनी वकिलामार्फत बँकेला नोटीस पाठविली, त्यास बँकेने योग्य उत्तर दिले आहे. कायदेशीर मार्गाने न जाता ते बँकेवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांचा हा खटाटोप कर्जफेडीची जबाबदारी टाळण्यासाठीच आहे. त्यामुळे कितीही खोटी कारणे दिली तरी ते कर्ज परतफेडीच्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाहीत.
इथे मात्र तोंडावर बोट
बँकेचे कणकवली शाखा व्यवस्थापक किशोर गुंजीकर यांनी आपण स्वत:च हे पैसे उचलले आहेत आणि ते परत करणार असल्याचे बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना बँकेत येऊन लिहून दिले आहे. त्यांनी या शाखेत आणखी काही लोकांच्या नावे असेच पैसे उचलल्याच्या तक्रारी आहेत. त्या पोलीस ठाण्यापर्यंतही गेल्या आहेत, परंतु अशा अधिकाऱ्यावर बँकेने काय कारवाई केली, हे मात्र या खुलाशामध्ये नाही. त्यांनी केलेला व्यवहार बँक व्यवस्थापनास मान्य आहे का, असा प्रश्न त्यातून उपस्थित होत आहे.