श्रीमंतीचीही रेषा तयार करा
By Admin | Updated: November 27, 2015 01:04 IST2015-11-27T00:55:33+5:302015-11-27T01:04:08+5:30
गौतमीपुत्र कांबळे : शिवाजी विद्यापीठात भारताचा संविधान दिन साजरा

श्रीमंतीचीही रेषा तयार करा
कोल्हापूर : भारतात आता दारिद्र्यरेषेप्रमाणे श्रीमंतांची यादी करून त्यांची एक श्रीमंतीचीही रेषा तयार करा, असे प्रतिपादन प्रा. डॉ. गौतमीपुत्र कांबळे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र यांच्यावतीने गुरुवारी भारताचा संविधान दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त मानव्यशास्त्र विभागात आयोजित ‘भारतीय राज्यघटना व डॉ. आंबेडकर’ या विषयावर ते बोलत होते.
ते म्हणाले, संविधान केवळ जगण्याचा विषय नाही, तर सामाजिक पर्यावरण बदलण्याचा घटनेने दिलेले साधन आहे. सर्व धार्मिकस्थळांवर जमा होणारी संपत्ती, दुरुस्ती, देखभाल वजा करून थेट सरकारी तिजोरीत जमा केली पाहिजे. त्यामुळे देशातील जरूरीच्या गोष्टी विना कर्ज जनतेकरीता उपलब्ध होतील. अनेक देशांत उत्क्रांती झाली म्हणून त्या-त्या देशात ‘संविधान’ तयार झाले. आजही अस्पृश्यता राजरोसपणे आहे. भारतातील प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यात अस्पृश्यता नाही, असे जाहीर करावे. त्यांना मी स्वत: एक हजाराचे बक्षीस देईन. आरक्षणामध्येही कळीचे मुद्दे आले आहेत. त्यात तुमचा आर्थिक दर्जा सुधारला आम्हालाही आरक्षण द्या, अशा प्रतिक्रिया अन्य जातीच्या नागरिकांकडून आल्या. आजपर्यंत ज्या संविधानात राहून गेलेल्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी धरण्याचा सर्वांनी आग्रह धरला पाहिजे. याशिवाय विद्यापीठ स्तरावर ‘संविधान’ हा विषय सक्तीचा करावा, असे मत त्यांनी मांडले. यावेळी कांबळे यांनी संविधानाची परिभाषा, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, आदी विषयांवर विस्तृत मते मांडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे समन्वयक डॉ. कृष्णा किरवले म्हणाले, धर्मनिरपेक्षता हाच कळीचा मुद्दा झालेला आहे. त्यामुळे संविधानचा डोलारा डोलायमान होत आहे. यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती पाटील यांनी संविधान सरनामा वाचन केले. यावेळी डॉ. भगवान माने, विद्यार्थी उपस्थित होते.