देशात सौहार्दाचे वातावरण निर्माण करा

By Admin | Updated: January 19, 2015 00:30 IST2015-01-19T00:08:09+5:302015-01-19T00:30:34+5:30

अशोक भोईटे : युवकांना केले आवाहन; मनुष्य स्वभावात बदल हवा

Create a harmonious atmosphere in the country | देशात सौहार्दाचे वातावरण निर्माण करा

देशात सौहार्दाचे वातावरण निर्माण करा

कोल्हापूर : देशाची विविध क्षेत्रांत प्रगतशील आगेकूच सुरू असतानाच सामाजिक दरीही वाढत असल्याचे दिसते. ही सामाजिक दरी सांधून सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आजच्या युवावर्गावर आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा प्रौढ आणि निरंतर शिक्षण व विस्तारकार्य विभाग आणि बहाई कॅडमी, पाचगणीतर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ‘बदलाकरिता नेतृत्व : व्यक्तिगत व सामुदायिक’ या विषयावरील उद्बोधन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. भोईटे म्हणाले, आज समाजातील एका वर्गाचा आर्थिक व शैक्षणिक विकास अगदी कमालीचा झाला आहे; तर दुसरीकडे आवश्यक सुविधांपासून वंचित असणाऱ्या घटकांचे प्रमाणही लक्षणीय आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार तरुण पिढीने राजकीय, सामाजिक व शैक्षणिक नेतृत्व करताना केला पाहिजे. विद्यार्थ्यांना सामाजिक परिस्थितीची जाणीव असणे गरजेचे आहे. आंदोलन कोणासाठी केले जात आहे, हेच कित्येकदा लोकांना समजत नाही. नेतृत्वाकडे नैतिक ताकद असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सहनशीलता, विनय, नीतिमूल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. नेतृत्वाने सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले पाहिजे.
आनंदी व्यक्तिमत्त्व, निरोगी अभिव्यक्ती व नैतिकता या गुणांचा विकास करून समाजात नवीन बदल घडवून आणण्यासाठी युवकांनी सज्ज झाले पाहिजे. सर्जनशील बनून नवनिर्मिर्तीचा आनंद घ्या. स्त्री-पुरुष समानता आणण्याबरोबरच कुटुंबात आणि समुदायात एकता निर्माण करा. प्रभारी संचालक व विभागप्रमुख डॉ. गोरखनाथ कांबळे यांनी प्रास्ताविक केले. बहाई कॅडमी, पाचगणी यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकरिता मूल्यशिक्षण, विद्यापीठ कर्मचारी प्रशिक्षण वर्ग, शिलेदार शिबिर, इत्यादी उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
या उद्बोधन कार्यक्रमात कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांच्यासह तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. गिरीश कुलकर्र्णी यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिक्षक व विद्यार्र्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. युवकांनी बदलांवर विश्वास ठेवावा. मनुष्यस्वभावात बदल होऊ शकतो. त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. प्रचलित क्रमिक शिक्षणपद्धतीमध्येही बदलांबाबत गांभीर्याने विचार आवश्यक आहे. नेतृत्वगुण सर्वांमध्ये असतात. फक्त त्यांचा विकास व्हायला हवा.
- लेझन आझादी, बहाई कॅडमी

Web Title: Create a harmonious atmosphere in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.