अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST2021-09-10T04:31:11+5:302021-09-10T04:31:11+5:30
कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आठवडाभरात कृती आराखडा तयार करा, अशा सूचना परिवहन राज्यमंत्री ...

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करा
कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आठवडाभरात कृती आराखडा तयार करा, अशा सूचना परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस दलाचे अधिकारी व सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पीयूष तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, पुणे-सातारा आणि सातारा-कागल महामार्गावर २०१९-२० एका वर्षामध्ये विविध कारणांमुळे झालेल्या रस्ते अपघातांमध्ये तब्बल १२५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा कॉरिडार ‘शून्य मृत्यू’ करण्यासाठी, तसेच राज्यातील सर्व महामार्ग, राज्यमार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित बनविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
यावेळी सेव्ह लाईफ संस्थेने राष्ट्रीय महामार्ग ४८ या महामार्गाची पाहणी करून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाला सादर केलेल्या अहवालावर चर्चा करण्यात आली. या अहवालामध्ये अभियांत्रिकी, अंमलबजावणी, आपत्कालीन प्रतिसाद आणि आवश्यक प्रशिक्षणाबाबत सविस्तर शिफारशी करण्यात आल्या आहेत. या सर्व शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी एका आठवड्यामध्ये कृती आराखडा बनविण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.
बैठकीत अनेक तज्ज्ञांनी अपघात नैसर्गिक कारणांनेही होतात, पण ९० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत असल्याचे अनेक अहवालातून समोर आले आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
चौकट
उपाययोजना कराव्यात
अतिवेग, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, अचानक लेन बदलणे, इंडिकेटर्स, हेडलाईट सुस्थितीत नसणे, आदी कारणांनी अपघात होत आहेत. या सर्व बाबींचा सविस्तर विचार करून योग्य त्या सर्व उपायोजना कराव्यात. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर पोलीसप्रमुखांना महामार्गावर चोवीस तास पेट्रोलिंगसाठी एक पथक तैनात करावे. आगामी काळात महामार्गावर माहिती तंत्रज्ञान आधारित पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.