काम करायला वेडं व्हायला हवं...
By Admin | Updated: February 7, 2015 00:06 IST2015-02-07T00:00:50+5:302015-02-07T00:06:02+5:30
राजाराम भापकर : स्वखर्चातून रस्ते केल्याबद्दल साठ हजार प्रदान

काम करायला वेडं व्हायला हवं...
कोल्हापूर : आमच्या गावापासून नगरला आणि बाजाराच्या ठिकाणी जायला ३० किलोमीटर अंतर वळसा घालायला लागायचा. ही अडचण दूर करण्यासाठी मी रस्ता खोदायला सुरुवात केली तेव्हा लोक मला ‘येडा मास्तर’ म्हणायची, पण आज जेव्हा या रस्त्यावरून लोकांची ये-जा बघतो तेव्हा होणारा आनंद मी सांगू शकत नाही. म्हणून सांगतो पोरांनो, ठरविलेले काम करायला वेडं व्हायला हवं...अशा शब्दांत राजाराम भापकर गुरुजींनी मुलांना यशाचा मूलमंत्र दिला.येथील शिवाजी मराठा स्कू लमध्ये झालेल्या या कार्यक्रमात उषादेवी खराडे यांनी भापकर गुरुजींना ६० हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला. यावेळी अजित खराडे उपस्थित होते.
गुरुजी म्हणाले, शिक्षक म्हणून पगार मिळायचा ६० रुपये त्यात १० रुपये घरात आणि बाकी सगळे रस्त्यांच्या कामासाठी द्यायचो. १९५७ ते १९९० एवढ्या वर्षात एक किलोमीटरचा रस्ता केला. त्यानंतरही रस्ते बनवले आणि ते समाजाला अर्पण केले. या रस्त्यावरची वर्दळ पाहिली की, अंत:करण आनंदी होते. तुम्हाला चांगले नागरिक व्हायचे असेल तर ध्येय ठरवा आणि त्यासाठी झपाटून काम करा. अडचणी येतच असतात. त्यावर मात करत मार्ग काढा आणि पुढे जा. मिलिंद यादव यांनी सूत्रसंचालन केले.