‘सीपीआर’प्रश्नी बेमुदत ठिय्याचा इशारा

By Admin | Updated: August 25, 2014 23:12 IST2014-08-25T23:07:50+5:302014-08-25T23:12:25+5:30

अधिष्ठाता धारेवर : बचाव कृती समितीचे आंदोलन ; आरोग्यमंत्र्यांचा बैठकीत निषेध

'CPR' question unanswered stance | ‘सीपीआर’प्रश्नी बेमुदत ठिय्याचा इशारा

‘सीपीआर’प्रश्नी बेमुदत ठिय्याचा इशारा

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील मूलभूत सुविधा व प्रलंबित (सीपीआर) प्रश्नांची कोणतीही सोडवणूक राज्यशासन व महाविद्यालय प्रशासनाने केलेली नाही. दोन महिन्यांत या प्रश्नांची सोडवणूक करतो, असे आश्वासन देणाऱ्या राज्याचे शिक्षण व वैद्यकीय मंत्री, आरोग्यमंत्री यांचा निषेध करत पुढील काही दिवसांत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय आज, सोमवारी सीपीआर बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने केला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता यांच्या कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीत अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांना धारेवर धरत प्रशासन नुसते आश्वासनाशिवाय काही देत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला.
गरिबांचे आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीपीआरच्या मूलभूत सोयी व प्रलंबित प्रश्नांसंदर्भात बचाव कृती समितीने अधिष्ठाता यांना रुग्णालयातील २१ प्रश्नांची यादी दिली होती. यामध्ये सीपीआरला पूर्ववत जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, औषधाचा निधी मिळावा, अशा अनेक प्रश्नांचा समावेश होता. यादीतील बहुतांश: प्रश्नांची राज्यशासनाने सोडवणूक केलेली नाही. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी आज कृती समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ अधिष्ठातांना भेटले. यावेळी वसंतराव मुळीक यांनी, रुग्णालयामध्ये रुग्णांना सोयी मिळत नाहीत. व्हेंटिलेटर उपलब्ध नाही, औषधांचा तुटवडा आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर कोठुळे यांनी, जिल्हा रुग्णालयाचा पूर्ववत दर्जा हा प्रश्न सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील आहे. हे ऐकून समितीतील सदस्य संतापले. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी आलेल्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी, सीपीआरमधील प्रश्न आठ दिवसांत सोडवू, असे आश्वासन दिले होते, पण दोन महिने उलटून गेले तरी त्यांनी कोणत्याही प्रश्नांची सोडवणूक केलेली नाही, असे सांगितले.
बाबा इंदुलकर यांनी, उद्या, मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोल्हापुरात येणार आहेत. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने त्यांची भेट घ्यावी. नांदेडला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला; परंतु सीपीआरला का नाही ? असा प्रश्न उपस्थित केल्यावर कोठुळेंनी प्रथमच नांदेडला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेला आहे, असा सीपीआरबाबत कोणताही प्रकार झालेला नाही असे सांगत शेंडा पार्क येथे वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम होणार आहे. त्यामुळे हे महाविद्यालय त्याठिकाणी स्थलांतरित होईल. यावर मुळीक यांनी, पुढील काळात वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे जाहीर करत राज्यशासनाचा निषेध केला.

सीटी स्कॅन, सर्पदंशची लस उपलब्ध आहे, पण अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होतो. तसेच पाच व्हेंटिलेटरपैकी दोन व्हेंटिलेटर सुरू आहेत, तर तीन व्हेंटिलेटर कालबाह्य झाली आहेत.
- डॉ. दशरथ कोठुळे, अधिष्ठाता

सीपीआरप्रश्नी शासनाकडे पाठपुरावा करा. लोकप्रतिनिधींशी चर्चा करा व सकारात्मक निर्णय घ्या तरच हे प्रश्न सुटतील.
-वसंतराव मुळीक, निमंत्रक

शिष्टमंडळात बाळासो भोसले, भगवान काटे, दिलीप पोवार, भाऊसो काळे, महेश मछले, किशोर घाटगे, प्रसाद जाधव, प्रताप साळोखे,अनिल पाटील,अवधूत पाटील आदींचा सहभाग होता.

Web Title: 'CPR' question unanswered stance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.