शिरोळ तहसीलवर माकपचा मोर्चा
By Admin | Updated: March 9, 2015 23:53 IST2015-03-09T20:46:18+5:302015-03-09T23:53:34+5:30
तहसीलदारांना निवेदन : सबसिडीऐवजी धान्य मिळावे, सरकारची धोरणे बदलण्याची मागणी

शिरोळ तहसीलवर माकपचा मोर्चा
शिरोळ : रोख सबसिडी नको त्याऐवजी धान्य मिळावे, केंद्र व राज्य सरकारची आडमुठी धोरणे बदलावीत, यासह विविध मागण्यांप्रश्नी सोमवारी मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष शिरोळ तालुक्याच्यावतीने शिरोळ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आपल्या मागण्या शासनास कळविण्याचे आश्वासन तहसीलदार सचिन गिरी यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. येथील शिवाजी चौकातून कोल्हापूरचे गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली दुपारी दीड वाजता मोर्चास सुरुवात झाली. ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा!, रेशन आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, यासह विविध घोषणा देत हा मोर्चा शिरोळ तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आला. त्याठिकाणी कॉ. चंद्रकांत यादव यांनी, रोख सबसिडी नको, धान्य मिळाले पाहिजे, रेशनकार्डमध्ये भेदभाव न ठेवता ३५ किलो धान्य मिळाले पाहिजे, रेशनमध्ये गहू, तांदळाबरोबर साखर, डाळी, खाद्यतेल, इत्यादी जीवनावश्यक वस्तू मिळाल्या पाहिजेत, प्रत्येक कार्डधारकाला पाच लिटर रॉकेल मिळाले पाहिजे, घरगुती वीजबिल प्रत्येक महिन्याला न मिळता, तीन महिन्याने मिळावे, तालुक्यातील सरकारी जागेवर राहणाऱ्यांचे अतिक्रमण कायम करावे, जांभळीमधील कुटुंबीयांना घरटी एक प्लॉट द्यावेत, कुरुंदवाडमधील बेघरांना ताबडतोब जागा देऊन घरे बांधून द्यावीत, डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंंदराव पानसरे यांच्या मारेकऱ्यांना ताबडतोब अटक करावी, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलकांसमोर जाहीर केले.
यावेळी नारायण गायकवाड, नजीर मोमीन, नेत्रदीपा पाटील, भाऊसाहेब कसबे यांनी आपली मते मांडली. शिष्टमंडळाद्वारे तहसीलदार सचिन गिरी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी गिरी यांनी सर्व मागण्या शासनास कळविण्याचे आश्वासन दिले.
मोर्चात इराप्पा कांबळे, तायाप्पा कांबळे, कल्लाप्पा मल्लेवाडे, लक्ष्मण मगदूम, अरुण मांजरे, आक्काताई तेली, राजाराम सदलगे, बळवंत कांबळे, वत्सला भोसले यांच्यासह शिरोळ तालुक्यातील महिला व नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)