देशांतर्गत बाजारपेठेत गाय दूध पावडरच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 02:33 PM2019-09-02T14:33:13+5:302019-09-02T14:37:55+5:30

गेले वर्षभर घसरण सुरू झालेल्या गाय दूध पावडरने चांगलीच उसळी घेतली असून, देशांतर्गत बाजारपेठेत २७५ रुपये किलोपर्यंत दर पोहोचला आहे.

Cow milk powder prices rise in domestic market | देशांतर्गत बाजारपेठेत गाय दूध पावडरच्या दरात वाढ

देशांतर्गत बाजारपेठेत गाय दूध पावडरच्या दरात वाढ

Next
ठळक मुद्देसहा महिन्यांत किलोमागे १३५ रुपयांची उसळी दूध टंचाईने पावडर प्लॅन्ट मोकळेच

राजाराम लोंढे

कोल्हापूर : गेले वर्षभर घसरण सुरू झालेल्या गाय दूध पावडरने चांगलीच उसळी घेतली असून, देशांतर्गत बाजारपेठेत २७५ रुपये किलोपर्यंत दर पोहोचला आहे. दुष्काळ आणि महापुरामुळे गाय दूध उत्पादनात मोठी घट झाली असून, अनेक खासगी व सहकारी दूध संघांचे दूध पावडर प्लॅन्ट अक्षरश: मोकळे पडले आहेत; त्यामुळे सहा महिन्यांत प्रतिकिलो १३५ रुपयांची वाढ झाली तर बटरचे दरही प्रतिकिलो ३१० रुपये झाला आहे.

गाईचे दूध अतिरिक्त झाल्याने राज्यातील दूध संघांनी पावडर तयार केली. पावडरचे उत्पादन जास्त आणि आंतरराष्ट्रीय  बाजारपेठेबरोबरच देशांतर्गत बाजारपेठेतील दरात घसरण सुरू झाली. पावडरचे दर प्रतिकिलो १२५ ते १४० रुपयांपर्यंत खाली आल्याने संघांचा तोटा होऊ लागला. परिणामी अनेक खासगी दूध संघांनी गाय दुधाची खरेदीच बंद केली, तर अनेकांनी १७-१८ रुपये लिटर दूध घेतले; त्यामुळे शेतकरीही हवालदिल झाला होता.

राज्यातील अग्रणी असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाला रोज गाईच्या तीन लाख लिटरच्या दुधाची पावडर करावी लागत होती; पण विदर्भातील काही जिल्हे व मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पडलेला दुष्काळ, त्यात पश्चिम महाराष्ट्रात  महापुराने दूध उत्पादन कमालीचे घटले आहे.

दूध कमी झाल्याने पावडरचे उत्पादन थंडावले आहे, परिणामी दरात वाढ झाली असून, देशांतर्गत बाजारपेठेत २७५ रुपये किलो दर झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी हा दर १४० रुपयांपर्यंत होता. हळूहळू १०,२० रुपये किलोमागे वाढत वाढत आता २७५ रुपयांपर्यंत पोहोचले. आंतरराष्ट्रीय  बाजारपेठेत दर अद्याप २१५ रुपयांपर्यंतच आहे.

‘गोकुळ’कडे चिमुटभरही पावडर नाही

एरव्ही शेकडो टन गाय दूध पावडर ‘गोकुळ’कडे पडून असायची; पण सध्या एक किलोही पावडर त्यांच्याकडे शिल्लक नाही. त्याचबरोबर पावडर प्लॅन्ट सध्या दुधाअभावी बंद आहे.

‘गोकुळ’ सीमाभागातील निर्बंध उठवले

गाईचे दूध अतिरिक्त झाल्याने ‘गोकुळ’ने सीमाभागातील तालुक्यात ७० टक्के म्हशीचे दूध घालणाऱ्या उत्पादकाकडून ३० टक्केच गाईचे दूध स्वीकारण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेतला होता. आता गाईचे दूध प्रतिदिनी पाच लाख लिटरच्या आत आल्याने सीमाभागातील निर्बंध उठविले असून, येईल तेवढे गाईचे दूध घेतले जात आहे.

द्रवरूपात दूध विकणारे आता तोट्यात

मध्यंतरी पावडरचे दर कमी होते, त्यावेळी लिक्विडमध्ये दुधाची विक्री करणारे नफ्यात होते. आता परिस्थिती उलटी झाली आहे. बाजारात गाय दूध ३४ ते ३६ रुपये लिटर दर आहे. वाहतूक व पॅकिंग खर्च पाहता, पावडर विक्रीतून जादा पैसे मिळत आहेत.

गाईचे दूध कमी झाल्याने पावडरचे उत्पादन घटले आहे; त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत दर सुधारले असून, ते २७० ते २७५ रुपये किलोपर्यंत आहेत.
- रवींद्र आपटे,
अध्यक्ष, गोकुळ

 

Web Title: Cow milk powder prices rise in domestic market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.