कोविशिल्डचे आजपासून लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:04+5:302021-07-08T04:17:04+5:30

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोविशिल्ड लसीचा पुरवठा न झाल्यामुळे ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झाले, अशा नागरिकांची अस्वस्थता ...

Covishield vaccination from today | कोविशिल्डचे आजपासून लसीकरण

कोविशिल्डचे आजपासून लसीकरण

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोविशिल्ड लसीचा पुरवठा न झाल्यामुळे ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झाले, अशा नागरिकांची अस्वस्थता आज, गुरुवारी संपणार आहे. आज दहा दिवसांच्या खंडानंतर कोविशिल्डचे लसीकरण केले जाणार आहे. मात्र, ज्यांना नागरी आरोग्य केंद्रातून फोन येतील, त्यांनीच लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहन महानगरपालिका आरोग्य विभागाने केले आहे.

महानगरपालिका प्रशासनास कोविशिल्डचे सात हजार डोस मिळाले आहेत. त्यामुळे आज, गुरुवारी सर्वच नागरी आरोग्य केंद्रांवर त्याचे लसीकरण सुरू होईल. पहिला डोस घेऊन ८४ पेक्षा जास्त दिवस झाले आहेत, अशांना प्राधान्यक्रमाने आरोग्य केंद्रातून फोन केले जाणार आहेत. त्यामुळे विनाकारण होणारी गर्दी नागरिकांनी टाळावे, असे लसीकरण नियंत्रण अधिकारी डॉ. अमोल माने यांनी केले आहे.

२१३४ नागरिकांचे लसीकरण-

दरम्यान, बुधवारी शहरातील ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांत ४५ वर्षांवरील २१२७ नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस व सात नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. शहरामध्ये पहिला व दुसरा डोस मिळून २१३४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे १७०, फिरंगाई २८१, राजारामपुरी २०३, पंचगंगा २२२, कसबा बावडा १८३, महाडिक माळ १६९, आयसोलेशन १८६, फुलेवाडी १६८, सदर बाजार २०५, सिद्धार्थनगर येथे १३५, मोरे मानेनगर येथे २१२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

महापालिका कार्यक्षेत्रात आतापर्यंत एक लाख २८ हजार ६४५ नागरिकांना पहिल्या डोसचे तर, ५१ हजार ९१५ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.

Web Title: Covishield vaccination from today