पस्तीस वर्षांनंतर बदलला अभ्यासक्रम
By Admin | Updated: August 31, 2015 00:09 IST2015-08-31T00:09:18+5:302015-08-31T00:09:18+5:30
कला संचालनालयाची मान्यता : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

पस्तीस वर्षांनंतर बदलला अभ्यासक्रम
संदीप आडनाईक- कोल्हापूर -पस्तीस वर्षांपूर्वीचा चित्रकलेचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, जुलै २0१५ पासून नवा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. राज्यात कला संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या एलिमेंटरी आणि इंटरमीजिएट शासकीय ग्रेड परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा, या उद्देशाने त्यात बदल करण्यात आला आहे.
चित्रकलेची नवीन पुस्तकेही केंद्र प्रमुखांमार्फत सर्व शाळांमध्ये वितरित करण्यात आली आहेत, अशी माहिती अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे सदस्य शिवाजी म्हस्के यांनी दिली.
१८८0 मध्ये जुन्या मुंबई राज्यात सर्वप्रथम ड्रॉर्इंग ग्रेड परीक्षा सुरू केल्या होत्या. १९६५ पासून राज्याच्या कला संचालनालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या या परीक्षा महाराष्ट्रासोबतच गोवा, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आदी राज्यांतही घेतल्या जातात.
विशेष म्हणजे चित्रकलेचे शिक्षण देणाऱ्या देशभरात ३८ अनुदानित संस्था असून, २५0 हून अधिक संस्था विनाअनुदानित आहेत.
२00९ मध्ये अभ्यासक्रम बदलण्याची मागणी कला शिक्षकांनी केली होती. २0१४ मध्ये अभ्यासक्रम बदलण्यास राज्य कला संचालनालयाची मान्यता मिळाली. २0१५ च्या शैक्षणिक वर्षापासून बदललेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली.
वर्तमानकालीन शैक्षणिक दृष्टिकोन व त्यातील कला शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित व्हावे. प्रस्तुत परीक्षांमुळे कलेची आवड निर्माण व्हावी, हा उद्देश आहे. त्यादृष्टीने अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे.
- शिवाजी म्हस्के,
सदस्य, अभ्यासक्रम पुनर्रचना
समिती, कोल्हापूर
ज्येष्ठ, अनुभवी व कलाध्यापनाचा अनुभव असलेले संपन्न कलाशिक्षक तसेच प्रशासकीय प्रतिनिधींच्या समितीने अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली. त्यावर अभिप्राय मागविण्यात आले. त्यानंतर सुधारित अभ्यासक्रमाच्या रचनेस अंतिम स्वरूप देण्यात आले.
- प्रा. गो. गो. वाघमारे,
प्रभारी कला संचालक,
कला संचालनालय, मुंबई