कोल्हापूरचा इतिहास देशाला कळायला हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST2021-01-23T04:25:17+5:302021-01-23T04:25:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूरला ताराराणी, राजर्षी शाहू महाराजांचा ऐतिहासिक वारसा आहे. या शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक ...

कोल्हापूरचा इतिहास देशाला कळायला हवा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरला ताराराणी, राजर्षी शाहू महाराजांचा ऐतिहासिक वारसा आहे. या शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभला असला तरी, हा वारसा नव्या पिढीलाही अवगत नाही, तो देशभरात पोहोचावा, पर्यटकांनी आवर्जून या शहराला भेट द्यावी यासाठी मार्केटिंग केले जावे व ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
सुळे यांनी शुक्रवारी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांची त्यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली. दोन तासांच्या या भेटीत त्यांनी पवार यांच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली. कोल्हापूरची माहिती जाणून घेताना त्या कौटुंबिक गप्पांमध्ये रमल्या. यावेळी वसुधा पवार, डाॅ. मंजुश्री पवार, अरुंधती पवार, संयोगिता पवार उपस्थित होत्या. यावेळी डॉ. पवार यांनी सुप्रिया सुळे यांना राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, छत्रपती राजाराम महाराज व सेनापती संताजी घोरपडे यांच्यावर आधारित पुस्तके भेट दिली.
राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरसाठी फार मोठे काम केले आहे. या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, मंदिरे आहेत. दुर्दैवाने त्याची माहिती जगभर पोहोचलेली नाही. ती पोहोचवण्यासाठी आधी कोल्हापुरातील नव्या पिढीला हा वारसा समजण्याची गरज आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा लाभला आहे. हा वारसा शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा लागेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
--
फाेटो स्वतंत्र पाठवला आहे.
--