भूमिअभिलेखकडून अखेर मोजणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:21+5:302021-03-26T04:22:21+5:30
शिये : शिये फाटा ते बावडा पुलापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी हद्द निश्चित करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडून ...

भूमिअभिलेखकडून अखेर मोजणी सुरू
शिये : शिये फाटा ते बावडा पुलापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी हद्द निश्चित करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडून गुरुवारी मोजणीस सुरुवात झाली. हद्द निश्चित झाल्यानंतर रस्त्यावरील अतिक्रमण काढणे सोपे होऊन वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे. शिये फाटा ते बावडा पुलापर्यंतचा रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे होते. मात्र, या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने रस्त्याची मोजणी क्रमप्राप्त होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमिअभिलेख कार्यालयाकडे मोजणी मागितली होती. मात्र, दीड वर्ष झाले तरी या मोजणीकडे संबंधित विभागाचे लक्ष नव्हते. त्यामुळे दैनिक लोकमतने ‘भूमिअभिलेखची हद्द झाली पैसे भरूनही मोजणी नाही’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच भूमिअभिलेख कार्यालयाकडून प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात करण्यात आली. ही मोजणी झाल्यानंतर रस्त्यालगत असणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यास प्रशासनास सहज शक्य होणार आहे. या मोजणीवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सी. एन. भोसले, भूमिअभिलेख कार्यालयातील महादेव पाटील, रावसाहेब एकल उपस्थित होते.
फोटो : २५ शिये मोजणी
शिये फाटा ते बावडा पुलापर्यंतची हद्द निश्चित करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यात आली.