बनावट नोटा तपास; ‘एनआयए’ सांगलीत
By Admin | Updated: July 19, 2015 00:42 IST2015-07-19T00:42:14+5:302015-07-19T00:42:34+5:30
शिरोळला छापे : आंतरराष्ट्रीय कनेक्शन नाही

बनावट नोटा तपास; ‘एनआयए’ सांगलीत
सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने उघडकीस आणलेल्या बनावट नोटा प्रकरणाच्या तपासाची राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) माहिती घेतली आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांपुरताच या प्रकरणाचा तपास मर्यादित आहे. कोणतेही आंतरराष्ट्रीय ‘कनेक्शन’ नसल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिली. दरम्यान, फरार असलेल्या तेरवाड (ता. शिरोळ) येथील विशाल चव्हाण याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने प्रवीण कांबळे, आप्पासाहेब घोरपडे, ऐनुद्दीन ढालाईत, सुभाष पाटील, रमेश घोरपडे, इम्रान ढालाईत, प्रभाकर रावळ, संदीप मुडलगी, दीपक हुडेद व बालाजी निकम या दहाजणांना अटक केली होती. त्यांच्याकडून ३४ लाख ३५ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. चौकशीतून विशाल चव्हाण याचे नाव निष्पन्न झाले आहे. एकूण अकराजणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीत एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त झाल्याने त्याची दखल राष्ट्रीय तपास यंत्रणेने घेतली. संशयितांची नावे, ते कुठे राहतात, त्यांचे आंतरराष्ट्रीय ‘कनेक्शन’ आहे का, याची खात्री करून घेतली आहे. दरम्यान, जप्त केलेल्या नोटा तपासणीसाठी नाशिक येथील छापखान्यात पाठविल्या आहेत. (प्रतिनिधी)
चव्हाणकडून पैशांचा पुरवठा
बनावट नोटांची छपाई करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीसह अन्य खर्चासाठी लागणारा पैसा फरार असलेल्या चव्हाणने पुरविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या शोधासाठी शिरोळ तालुक्यात छापे टाकण्यात आले; पण कुठेच सुगावा लागला नाही. लवकरच त्यास अटक केली जाईल, असे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी सांगितले.