नगरसेवकाचे उपोषण सुरू
By Admin | Updated: May 20, 2015 23:58 IST2015-05-20T23:55:42+5:302015-05-20T23:58:09+5:30
इचलकरंजी नगरपालिका : नागरी सेवा-सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

नगरसेवकाचे उपोषण सुरू
इचलकरंजी : येथील प्रभाग क्रमांक १३ मधील स्वच्छता व अन्य नागरी सेवा-सुविधा नगरपालिकेने ताबडतोब पुरवाव्यात, या मागणीसाठी नगरसेवक संतोष शेळके यांनी बुधवारपासून नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषणास सुरुवात केली.
प्रभाग क्रमांक १३ मधील स्वच्छतेचा खासगी ठेका दोन महिन्यांपूर्वी संपला. त्यानंतर नगरपालिकेकडील तोकड्या यंत्रणेवर त्या परिसरातील स्वच्छता योग्यरितीने होत नाही. कचरा उठाव वेळेवर न झाल्याने गटारी तुंबतात. तसेच रस्तेसुद्धा खड्डेमय झाले आहेत. तरी स्वच्छता, रस्ते दुरुस्ती ताबडतोब व्हावी, या मागणीसाठी वारंवार निवेदने देऊनसुद्धा नगरपालिकेचे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. म्हणून बुधवारी सकाळपासून नगरसेवक शेळके यांनी उपोषणास सुरुवात केली.
शेळके यांच्या उपोषणास पाणीपुरवठा सभापती रवी रजपुते, शहर विकास आघाडीचे गटनेते महादेव गौड, मदन झोरे, कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर, आदींसह काही नगरसेवक-नगरसेविकांनीही पाठिंबा दर्शविला. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतरच उपोषण सोडण्यात येईल, असे बुधवारी सायंकाळी नगरसेवक शेळके यांनी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)