वेशभूषाकार कमल पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST2021-05-05T04:40:54+5:302021-05-05T04:40:54+5:30
कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील जुन्या पिढीतील वेशभूषा व केशभूषाकार कमल बाळासाहेब पाटील (वय ७४) यांचे मंगळवारी कोरोनाने निधन झाले. ...

वेशभूषाकार कमल पाटील यांचे निधन
कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील जुन्या पिढीतील वेशभूषा व केशभूषाकार कमल बाळासाहेब पाटील (वय ७४) यांचे मंगळवारी कोरोनाने निधन झाले. आजवर त्यांनी साडेचारशेहून अधिक चित्रपटांसाठी काम केले होते. विशेषत: अभिनेत्रींना नऊवारी साडी नेसवण्यात त्यांचा हातखंडा होता. त्या संभाजीनगर येथे राहत होत्या. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे.
कमल पाटील यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी सुरुवातीला मराठी चित्रपटांमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. पुढे तीन-चार वर्षांनी वेशभूषाकार व केशभूषाकार म्हणून त्यांना संधी मिळाली. मराठीतील नावाजलेल्या अभिनेत्रींची त्यांच्या भूमिकेच्या गरजेनुसार वेशभूषा करायच्या. अतिशय सुरेख पद्धतीने नऊवारी साडी नेसवण्यात त्यांचा हातखंडा होता. अलका कुबल, मधू कांबीकर, पद्मा चव्हाण, जयश्री गडकर या अभिनेत्री त्यांच्याशिवाय अन्य कोणाकडून वेशभूषा करून घ्यायच्या नाहीत.
माहेरची साडी, झपाटलेला, माझा छकुला, मुंबई ते मॉरीशस, धूमधडाका, आम्ही सातपुते, एक होता विदूषक, देवा शपथ खरं सांगेन, कशाला उद्याची बात, सासरचं धोतर, चल रे लक्ष्या मुंबईला, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी वेशभूषाकार म्हणून जबाबदारी निभावली होती. त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रकर्मी पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते.
---
फोटो नं ०४०५२०२१-कोल-कमल पाटील (निधन)
---