एवढ्या खर्चात गाव निर्मल झाला असता
By Admin | Updated: February 7, 2015 00:23 IST2015-02-07T00:17:41+5:302015-02-07T00:23:27+5:30
‘निर्मल’चा पंचनामा : कार्यशाळेच्या उधळपट्टीवरून उपाध्यक्षांच्या प्रशासनास कानपिचक्या

एवढ्या खर्चात गाव निर्मल झाला असता
कोल्हापूर : शिंगणापुरातील निवासी शाळेत कार्यशाळा घेतली असती तरी चालले असते. मला व अध्यक्षाला न विचारता रेसिडन्सी क्लबला कार्यशाळा आयोजित करून उधळपट्टी केलेल्या पैशातून एखादे गाव निर्मल झाले असते. कार्यशाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार गैरहजर राहतात हे दुर्दैव आहे, अशा शब्दात उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी शुक्रवारी प्रशासनास कानपिचक्या दिल्या.निमित्त होते, निर्मलग्राम व वार्षिक कृती आराखडा कार्यशाळेचे. ताराबाई पार्कातील रेसिडन्सी क्लबमध्ये आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील होत्या.
उपाध्यक्ष खोत म्हणाले, जिल्ह्यातील २६ गावे काही राजकीय विघ्नं आडवी आल्यामुळे निर्मल होत नसल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांनी आता व्यवहार आणि नियम यांची सांगड घालून प्रयत्न करावेत. केवळ नियमावर बोट ठेवल्यास शिल्लक गावे कधीही निर्मल होणार नाहीत. उपरोधिक शब्दात ‘निर्मल’चाच पंचनामा करताना सदस्य धैर्यशील माने म्हणाले, देशात पहिल्यांदा पन्हाळा तालुका निर्मल झाला. परंतु, अजूनही जिल्ह्यातील २६ गावे निर्मल झालेली नाहीत. ही गावे निर्मल व्हावीत यासाठी उघड्यावर शौचविधी करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले. शासकीय सुविधा खंडीत केल्या. तरीही गावे निर्मल होत नाहीत. पोलिसांचा धाक दाखविल्यानंतर सुधारणा होते. मात्र, वारंवार गुन्हा करण्याची सवय झाली की अट्टल बनतो. अशी अवस्था २६ गावांची झाली आहे. माझ्या रूकडी गावासह २६ गावे ‘अट्टल’ बनली आहेत. कितीही अभ्यास केला तरी त्याच त्या वर्गात बसण्याची वेळ आली आहे. निर्मल झालेल्यांचा जशाचा तसा पेपर उतरून कॉपी केली तरी पास होत नाही. परीक्षणासाठी येणाऱ्या समितीनेच ही गावे निर्मल होऊ नयेत अशी मानसिकता केलेली दिसते. निर्मल गावातील ४० टक्के कुटुंबे पुन्हा उघड्यावर शौचविधी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी प्रास्ताविक केले. ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक संचालक पी. बी. पाटील यांचे भाषण झाले. कार्यशाळेस किरण कांबळे, शहाजी पाटील यांच्यासह सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन यावर मार्गदर्शन झाले. ( प्रतिनिधी )
प्रशासन ' लक्ष्य '
निर्मल अभियानाला चालना मिळण्यासाठी कार्याशाळा आयोजित केली होती. मात्र निर्मलग्रामचा पंचनामा माने आणि खोत यांनी करीत प्रशासनाला ‘लक्ष्य’ केले. शिल्लक गावे निर्मल करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे सांगण्यासही ते विसरले नाही.