अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला : भक्तांनी वाहिलेल्या २६ लाखांच्या साड्या गायब ?, तीन वर्षांनी प्रकार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 12:55 PM2021-12-02T12:55:24+5:302021-12-02T12:56:08+5:30

सन २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे पीडित महिलांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने साड्या वाटपाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अंबाबाई मंदिरातून ५ हजार साड्या नेण्यात आल्या.

Corruption in West Maharashtra Devasthan Samiti 26 lakh sarees missing from temple | अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला : भक्तांनी वाहिलेल्या २६ लाखांच्या साड्या गायब ?, तीन वर्षांनी प्रकार उघड

अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला : भक्तांनी वाहिलेल्या २६ लाखांच्या साड्या गायब ?, तीन वर्षांनी प्रकार उघड

Next

इंदुमती गणेश

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला भक्तांनी वाहिलेल्या २६ लाख ३३ हजार किमतीच्या ५ हजारांवर साड्या अक्षरश: गायब झाल्या आहेत. पूरग्रस्तांसाठी म्हणून या साड्या अंबाबाई मंदिरातून नेण्यात आल्या असून, त्या कोणी-कोणी नेल्या, कोणत्या तारखेला नेल्या, किती पूरग्रस्त महिलांना त्यांचे वाटप केले, त्यांची नावे, पत्ते यांपैकी कोणतीही माहिती देवस्थानच्या दप्तरी नोंद नाही. ‘लोकमत’ने माहितीच्या अधिकारात याची माहिती मागितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, कर्मचारीदेखील हैराण आहेत.

सन २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे पीडित महिलांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने साड्या वाटपाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अंबाबाई मंदिरातून ५ हजार साड्या नेण्यात आल्या. त्या शहर-जिल्ह्यातील किती पूरग्रस्त महिलांना वाटण्यात आल्या, महिला निवडीचे निकष कोणते, लाभार्थी महिलांची यादी, पत्ते, दूरध्वनी क्रमांक, साडी मिळाल्याची सही किंवा अंगठा यांपैकी कोणतीही माहिती देवस्थान समितीकडे नाही.

समितीच्या कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर अंबाबाई मंदिर आहे; तरीही मुख्य कार्यालयाकडे या साड्यांची माहिती नाही, हे आश्चर्यच आहे. सामाजिक साहाय्यतासंबंधीचे स्वतंत्र दप्तर आहे. त्यात विविध संस्थांना केलेली मदत, महापूर, कोरोनाकाळातील मदत यांची माहिती आहे; पण त्यात साड्यांबद्दलचे एकही कागदपत्र नाही. ‘लोकमत’ने माहिती अधिकारात अर्ज केल्यानंतर अंबाबाई मंदिरातून यादी मागवली गेली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.

बेजबाबदारपणा की टाळाटाळ?

अंबाबाईला आलेल्या साड्या मंदिरात असतात. त्यांचा हिशेब ठेवण्याची सगळी जबाबदारी व्यवस्थापकांची आहे. ‘लोकमत’ने माहिती मागितल्यानंतर मंदिरातून मुख्य कार्यालयाला फक्त ५ हजार साड्या ज्या-ज्या दिवशी आल्या ती तारीख, पावती क्रमांक आणि मूळ किंमत एवढीच २०० पानांची यादी पाठविली आहे. महापुरानंतर आठ दिवसांत रोज ट्रॉली भरून साड्या मंदिरातून नेल्या जात असताना काहीतरी नोंद तेथील दप्तरी असणे अपेक्षित आहे; पण ही नोंदच नसेल तर टोकाचा बेजबाबदारपणा आहे किंवा नोंद असूनदेखील माहिती दिलेली नाही.

सहा प्रश्नांची उत्तरे निरंक

माहिती अधिकारात सात प्रश्न विचारले होते, त्यांपैकी ६ प्रश्नांबाबत ‘या कार्यालयाच्या अभिलेखात माहिती निरंक आहे,’ असे उत्तर मिळाले. फक्त चौथ्या क्रमांकात विचारलेल्या पूरग्रस्त महिलांना वाटलेल्या एकूण साड्या किती, या प्रश्नावर ‘व्यवस्थापक, श्री करवीरनिवासिनी देवस्थान यांच्या रिपोर्टप्रमाणे पाच हजार साड्यांच्या यादीची छायांकित प्रत आहे,’ एवढेच उत्तर आले आहे.

मग साड्या नेल्या कोणी?

पूरग्रस्तांना वाटण्यासाठी या साड्या अधिकारी, पदाधिकारी किंवा सदस्यांनी नेल्या का? कोणी, किती साड्या कोणत्या तारखेला नेल्या, या प्रश्नांची उत्तरे समितीकडे नाहीत. साड्या पदाधिकाऱ्यांनी नेल्या नाहीत. देवस्थानमधील एकही कर्मचारी परस्पर एवढे मोठे धाडस करूच शकत नाहीत; मग साड्या नेल्या कोणी, त्यावेळी जबाबदार कर्मचारी काय करीत होते, हा मोठा प्रश्न आहे.

१० हजाराची साडी पूरग्रस्तांना ?

अंबाबाई मंदिरातून पूरग्रस्तांसाठी दिलेल्या साड्यांच्या यादीतील अनेक साड्यांची किंमत १ ते ११ हजार रुपयांपर्यंत आहे. देवस्थान समिती एवढी उदार झाली की, तिने एवढ्या महागड्या, भारदस्त, उंची आणि अंबाबाईला नेसविलेल्या साड्या पूरग्रस्तांना दिल्या आहेत; यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का? उर्वरित साड्यांमध्येही काही साड्या या ५०० ते ९५० रुपयांपर्यंतच्या आहेत.

लाखोंचा अपहार

भाविकांनी अंबाबाईला अर्पण केलेल्या साडीच्या ६० टक्के रक्कम भरून ती कोणालाही खरेदी करता येते. यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील ६० हजारांवर रक्कम भरून तिरूपती देवस्थानने दिलेला शालू खरेदी केला आहे. पण महापुराच्या काळात नेलेल्या उंची साड्यांचे पैसे संबंधितांनी देवस्थान समितीला जमा केलेले नाहीत. हा सरळसरळ साड्यांच्या नावाने झालेला लाखोंचा अपहार आहे.

किंमत : नेलेल्या साड्या

१ हजारच्या साड्या : १८१

२ हजारांच्या साड्या : १४३

३ हजारांच्या साड्या : ४९

४ हजारांच्या साड्या : ३३

५ हजारांच्या साड्या : २१

६ हजाराच्या : १४

७ हजारांच्या : १०

८ हजारांच्या साड्या : ८

९ हजारांच्या : ३

१० हजारांच्या : १

११ हजारांच्या : २

Web Title: Corruption in West Maharashtra Devasthan Samiti 26 lakh sarees missing from temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.