राज्यातील आरोग्य खाते भ्रष्टाचाराचे कुरण, विनायक राऊत यांचा आरोप 

By भीमगोंड देसाई | Published: March 16, 2024 06:12 PM2024-03-16T18:12:30+5:302024-03-16T18:14:31+5:30

कोल्हापूर सीपीआरसह नागपूर, पुण्यातही औषध खरेदीत घोटाळा

Corruption in procurement of medicines in government hospitals in Pune, Nagpur including CPR in Kolhapur, Allegation of Vinayak Raut | राज्यातील आरोग्य खाते भ्रष्टाचाराचे कुरण, विनायक राऊत यांचा आरोप 

राज्यातील आरोग्य खाते भ्रष्टाचाराचे कुरण, विनायक राऊत यांचा आरोप 

कोल्हापूर : राज्यातील आरोग्य विभाग व्हेंटीलेटरवर आहे. भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. कोल्हापुरातील सीपीआरसह पुणे, नागपूर येथील शासकीय दवाखान्यात औषध खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्ट लोकांना आरोग्य मंत्रीच पाठीशी घालत आहेत, असा आरोप ठाकरे गट शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी केला.

शासकीय विश्रामगृहात आयोजित शिव आरोग्य सेना मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिव आरोग्य सेनेचे कार्यध्यक्ष डॉ. किशोर ठाणेेकर, उपाध्यक्ष डॉ. जयवंत गाडे, राज्य सचिव डॉ. अजित पाटील, माजी आमदार सुजीत मिणचेकर, शिवसेना उपनेते संजय पवार, जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, संजय चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

राऊत म्हणाले, राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना आरोग्य खात्याबद्दल काहीही देणेघेणे नाही. यामुळे आरोग्य विभागाचा कारभार कोलमडला आहे. कोरोना काळात काम केलेल्या आरोग्य सेविकांचा पगार अजूनही मिळालेला नाही. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम केवळ जाहिरातबाजीसाठी राबवला आहे. प्रत्यक्षात याचा जनतेला काहीही लाभ झालेला नाही.

लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच उमेदवार जाहीर होतील. आघाडीत चांगला समन्वय आहे. अंबादास दानवे हे कोठेही जाणार नाहीत. ते उध्दव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहेत. दरम्यान, शिव आरोग्य सेना मेेळाव्यात नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. मेळाव्यात खासदार राऊत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज्यातील आरोग्य विभागातील चुकीच्या कारभारावर टिका केली.

मालोजीराजे यांनी घेतली भेट

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून शाहू छत्रपती रिंगणात उतरणार आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांचे पूत्र आणि कँाग्रेसचे नेते आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी शासकीय विश्रामगृहात खासदार विनायक राऊत यांची भेट घेवून चर्चा केली.

Web Title: Corruption in procurement of medicines in government hospitals in Pune, Nagpur including CPR in Kolhapur, Allegation of Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.