दूषित पाणी अधिकाऱ्यांना पाजा !

By Admin | Updated: November 28, 2014 23:45 IST2014-11-28T23:32:26+5:302014-11-28T23:45:15+5:30

सोमवारी शहरात पाणीपुरवठा बंद

Corrupt water officials! | दूषित पाणी अधिकाऱ्यांना पाजा !

दूषित पाणी अधिकाऱ्यांना पाजा !

कोल्हापूर : शहरातील बहुतांश भागात दूषित पाणी येत आहे. प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. लोक जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना चांगले पाणी पाजा, असा घणाघात नगरसेवक आदिल फरास, माजी महापौर जयश्री सोनवणे व लीला धुमाळ यांनी आज, शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. दूषित पाण्याची बाटलीच अधिकाऱ्यांसमोर धरत सोनवणे यांनी ‘हे पाणी प्या अन् हजार रुपये मिळवा’ असे आव्हान दिले. अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या.
नागाळा पार्क, वाय. पी. पोवारनगर, आदी परिसरातील नळाला गेले अनेक दिवस दूषित व काळे पाणी येत आहे. पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करूनही उपाय योजत नाहीत. त्यामुळे चिडलेल्या नगरसेवकांनी आजच्या सभेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी, पाईपलाईन जोडणी व रस्त्यांची कामे सुरू असल्याने असा प्रकार घडला असावा. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
खुली जागा नागरिकांना खरेदी करून देण्यापूर्वी इतर सत्ताप्रकार काढून ती निर्वेध करून द्यावी, अशी प्रकाश नाईकनवरे यांनी केलेली मागणी मान्य करीत आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी ‘बी-टेन्युअर’ काढूनच मिळकती देण्याचे आदेश दिले.
कुष्ठरोगींना दरमहा हजार रुपये देण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. अपंग कल्याण निधीतील मंजूर ५० लाखांचा निधी अपंग व्यक्तींना सन्मानाने वाटप करा, यासाठी एक खिडकी योजना राबवा, अशी सूचना आदिल फरास यांनी केली. कुष्ठरोगींना प्रथम पैसे वाटप करून उर्वरित पैसे अपंगांच्या संवर्धनासाठी खर्च करण्याची मागणी भूपाल शेटे यांनी केली. अपंग संघटनांची बैठक घेऊन शासकीय योजना व निधीबाबत मार्गदर्शन करणार असल्याचे शेटे यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या स्थापनेपासून १९७४ नंतर आजपर्यंत कर्मचाऱ्यांच्या सुचीमध्ये बदल केलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने नव्याने नोकरभरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना राजेश लाटकर यांनी केली.


सोमवारी शहरात पाणीपुरवठा बंद
कोल्हापूर : शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेवरील ११०० एमएम जाडीच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. ही गळती काढण्याचे काम सोमवार (दि. १)पासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवस शहरातील ए, बी व ई या वॉर्डांतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे शहरवासीयांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांना टॅॅँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली असून, काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन जलअभियंता मनीष पोवार यांनी के ले आहे. सोमवारी दिवसभर गळती काढण्याचे काम सुरू राहणार आहे. मंगळवारी
(दि. २) काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल.
पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर:
साळोखेनगर पाण्याची टाकी परिसर, आपटेनगर, महाराष्ट्रनगर, बापूरामनगर, दादू चौगलेनगर व परिसर, जरगनगर, रामानंदनगर परिसर, रायगड कॉलनी, पोवार कॉलनी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठेचा काही भाग, संभाजीनगर, एलआयसी कॉलनी, देवकर पाणंद, साळोखे पार्क, जवाहरनगर, वाय. पी. पोवारनगर, ई वॉर्डातील शाहूपुरीतील काही भाग, कावळा नाका परिसर, बापट कॅम्प, शिवाजी पार्क, टाकाळा, संपूर्ण राजारामपुरी ,शाहू मिल, उद्यमनगर, सम्राटनगर, जागृतीनगर, राजेंद्रनगर, आदी.


अनधिकृत बांधकामास बगल
नगरसेविका सरस्वती पोवार यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. या प्रकरणाच्या न्यायालयामार्फत चौकशीचा विषय प्रशासनाने सभेपुढे ठेवला. परंतु, चौकशीला परवानगी दिल्यास पोवार यांचे पद धोक्यात येणार आहे, तर नामंजूर केल्यास नगरसेवकच अनधिकृत बांधकामास पाठीशी घालतात, असा आरोप होणार आहे. त्यामुळे सभागृहाची गोची करणारा हा विषय पुढील सभेत चर्चेसाठी घेण्याचे ठरले.


तासाभरात सभा संपली
इतरवेळी अकरा वाजता सुरू होणारी सभा एक वाजता सुरू होई अन् चर्चेचे गुऱ्हाळ चार वाजेपर्यंत चालत असे. मात्र, आजची सभा बारा वाजता सुरू होऊन पाऊण तासात संपली. वास्तुशांती व लग्नाचे मुहूर्त असल्याने सभा लवकर गुंडाळण्यात आल्याची चर्चा आहे.

महापालिका सभेत प्रशासन धारेवर
जैवकचरा निर्मूलनाचा ‘एस. एस.’ ला ठेका
नवीन कर्मचाऱ्यांची सुची करणार
कुष्ठरोगींना मासिक हजार रुपये मानधन
शाहू जलतरण तलाव चालविण्यास देणार
अपंगांना योजनांची माहिती देणार

Web Title: Corrupt water officials!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.