दूषित पाणीप्रश्नी अधिकारी धारेवर

By Admin | Updated: April 10, 2015 23:47 IST2015-04-10T21:29:54+5:302015-04-10T23:47:33+5:30

ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रित सांडपाणी तळंदगेच्या ओढ्यात

Corrupt water dispute officer Dharever | दूषित पाणीप्रश्नी अधिकारी धारेवर

दूषित पाणीप्रश्नी अधिकारी धारेवर

हुपरी : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रित प्रदूषित सांडपाणी प्रक्रिया केंद्रामधून कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करताच प्रदूषित पाणी तळदंगे (ता. हातकणंगले) गावाच्या ओढ्यामध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वारंवार सूचना व आंदोलन व तक्रारी करुनही यामध्ये बदल होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळ, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, पंचतारांकित औद्योगिक वसाहत सीईडीपी असोसिएशन व ठेकेदार थर्म्याक्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले.
दरम्यान, तळदंगे ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता याप्रश्नी योग्य मार्ग काढावा, अन्यथा सर्व संबंधित घटकांच्या विरोधात न्यायालयात धाव घ्यावी लागेल, तसेच ए. व्ही. एच. प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची कोणीही वाट पाहू नये, असा सज्जड दम उपसरपंच राजेंद्र हवालदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाखाध्यक्ष सागर चौगुले यांनी यावेळी दिला. सीईटीपी असोसिएशन व ठेकेदार असणाऱ्या थर्म्याक्स कंपनीची संयुक्त बैठक घेवून प्रदूषित पाणीप्रश्नी मार्ग काढू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रित प्रदूषित पाण्यावरती प्रक्रिया करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने तळंदगे गावानजीक सीईटीपी प्रकल्पाची उभारणी केली आहे. हा प्रकल्प चालविण्यासाठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत सीईटीपी असोसिएशनला देण्यात आला आहे. या असोसिएशनने या प्रकल्पाची देखभाल व हाताळणी करण्याची जबाबदारी पुण्याच्या थर्म्याक्स कंपनीली दिली आहे. प्रदूषण महामंडळाने नेहमीप्रमाणे पाण्याचे नमुने घेतले. औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांनी याप्रश्नी बैठक घेऊन सूचना देणे व मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ. रमेश औटी, डी. आर. शेंडे, आर. एस. जाधव, सुहास महादर, आर. एस. माधव, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)


दोन महिन्यांपूर्वी तळंदगे ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर प्रकल्पातून प्रक्रिया केलेले व ग्रामस्थांची तक्रार येणार नाही, याबाबतची खबरदारी घेऊन पाणी सोडण्यात येत होते.
मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून पूर्ववत दुर्गंधीयुक्त, काळे व कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न केलेले प्रदूषित पाणी गावाच्या ओढ्यात सोडण्यात येत आहे.
याबाबत तक्रार देऊनही काहीच फरक पडत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना ओढ्यानजीक बोलावून घेऊन परिस्थितीची जाणीव करुन दिली.
यावेळी ग्रामस्थांनी सर्वच अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करुन भंडावून सोडले.

Web Title: Corrupt water dispute officer Dharever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.