सुधारित बातमी - बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:23 IST2021-05-10T04:23:37+5:302021-05-10T04:23:37+5:30
कोल्हापूर : बालकल्याण संकुलमधील १४ मुली रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील ...

सुधारित बातमी - बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोना पॉझिटिव्ह
कोल्हापूर : बालकल्याण संकुलमधील १४ मुली रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचा अंदाज दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. तोपर्यंतच या मुली पॉझिटिव्ह आल्याने लहान मुलांचा धोका वाढला आहे.
कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथांचे संगोपन केले जाते. कोरोनाचा कहर सुरू होऊन एक वर्ष झाले तरी आजपर्यंत एकही रुग्ण संकुलात आढळला नव्हता; पण रविवारी वर्षभराच्या काळजीवर पाणी फिरवत येथे कोरोनाने शिरकाव करत ६ ते १८ वयोगटातील तब्बल १४ जणींना बाधित केले. यामुळे बाल कल्याण संकुल प्रशासन हादरले असून, तातडीने उपचार व तपासण्या सुरू केल्या आहेत.
पाण्याच्या खजिन्याजवळील या संकुलमध्ये एका मुलीला तापाची लक्षणे जाणवत होती, म्हणून अँटिजन चाचणी केली असता ती कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आली. लगेच तिच्या संपर्कातील अन्य मुलींची तपासणी केली गेली. यात आणखी १३ जणी पॉझिटिव्ह आढळून आल्या. तातडीने त्यांना कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले. संपूर्ण संकुलात औषध फवारणी करण्यात आली. आणखी कोणाला लागण झाली असल्यास कळावी म्हणून आज, सोमवारी महापालिकेतर्फे मुलांची अँटिजन चाचणी केली जाणार आहे.
२५० मुलांचा सांभाळ
बालकल्याण संकुलमध्ये पाच युनिटमध्ये २५० मुले - मुली राहतात. त्यात ४६ मुली आहेत. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्यांमध्ये सहा वर्षांची एक, आठ वर्षांची एक, नऊ आणि १० वर्षांच्या तीन आणि उर्वरित १७ ते १८ वयोगटातील मुली आहेत.
- प्रकृती चांगली-
कोरोना झालेल्या या मुलींमध्ये सध्या कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत. त्यांची प्रकृती चांगली आहे.
- असा झाला शिरकाव-
बालकल्याण संकुलमध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत आणलेल्या मुलींनाही ठेवले जाते. त्यांना कोणतीही वेगळी वर्तणूक देता येत नाही. गेल्या आठवड्यात अशा १० ते १२ मुली आल्या होत्या. त्यांची कोणतीही चाचणी न घेता तसेच स्वतंत्र विलगीकरण न करताच त्यांना येथे ठेवले गेले. पाॅझिटिव्ह आढळलेल्या १४ जणींमध्ये तब्बल सहा ते सात जणी अशा बाहेरून आलेल्या आहेत. त्यांच्यामुळेच लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पुरेशी काळजी तरीही..
गेले वर्षभर खूप काळजी घेतली जात आहे. या मुलांच्या संपर्कात कोणी येऊ नये म्हणून बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अंघोळ करून कपडे बदलून मगच आत यावे, असा नियम होता. त्याचे काटेकोर पालन आजही केले जाते. आम्ही खूप काळजी घेतली; पण पोक्सो कायद्यांतर्गत येणाऱ्या मुलींमुळेही येथील लहानग्या मुलांना त्रास सहन करावा लागला आहे. बाहेरून येणाऱ्या मुलींसाठी विलगीकरण कक्षाची गरज आहे.
पद्मजा तिवले
मानद कार्यवाह
बालकल्याण संकुल कोल्हापूर.