नगरसेवकांत धक्काबुक्की
By Admin | Updated: April 7, 2015 01:22 IST2015-04-07T01:08:45+5:302015-04-07T01:22:52+5:30
स्वच्छतेवरून राडा : इचलकरंजी नगराध्यक्षांच्या दालनातील प्रकार

नगरसेवकांत धक्काबुक्की
इचलकरंजी : इचलकरंजीच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या कार्यालयात सोमवारी सायंकाळी नगरसेवक मोहन कुंभार व माजी नगरसेवक व शहर विकास आघाडीचे प्रमुख सागर चाळके यांच्यात झालेल्या वादाचे पर्यवसान एकमेकांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ करण्यामध्ये झाले. यावेळी या दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यामुळे सुमारे तासभर तणाव निर्माण झाला होता. या घटनेबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
दरम्यान, नगरसेवक कुंभार यांनी आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांना त्यांच्या प्रभागातील स्वच्छतेच्या कामावरून शिवीगाळ केली. त्यामुळे संतप्त झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करीत कुंभार यांच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. आंदोलनकर्ते कर्मचारी नगराध्यक्षांच्या कार्यालयात असताना आजी-माजी नगरसेवकांमध्ये वाद व शिवीगाळ झाल्याने गोंधळात अधिकच भर पडली.नगरसेवक कुंभार हे वॉर्ड क्रमांक १३ मधून निवडून आले असून, वॉर्ड क्रमांक १३ व १४ मधील खासगी सफाईच्या ठेक्याची मुदत संपली आहे. परिणामी गेले चार-पाच दिवस या दोन्ही प्रभागांत स्वच्छता झाली नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याची विचारणा करण्यासाठी कुंभार आरोग्य अधिकारी डॉ. संगेवार यांच्या कार्यालयात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता गेले आणि त्यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता करावी, असे सांगत वाद घातला. या वादातून पुढे शिवीगाळ झाली. त्यानंतर मात्र नगरसेवक कुंभार तिथून बाहेर पडले.
कुंभार यांनी तिथे शेजारीच असलेल्या सभागृहामध्ये काही पत्रकारांना शहरातील काही गटारींच्या बांधकामाची निविदा काढून ७३ लाखांचा भ्रष्टाचार चालवला असल्याचा आरोप केला. एव्हाना डॉ. संगेवार यांना शिवीगाळ केल्याची बातमी नगरपालिकेच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना पोहोचली होती. हे सर्वजण आपले काम बंद ठेवून डॉ. संगेवार यांच्या कार्यालयात गेले. तेथून याचा जाब विचारण्यासाठी या सर्व कर्मचाऱ्यांनी आपला मोर्चा नगराध्यक्षा बिरंजे यांच्या कार्यालयाकडे वळविला. घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांनी नगराध्यक्षांना दिली. त्यावेळी तिथे माजी नगरसेवक व शहर विकास आघाडीचे प्रमुख सागर चाळके उपस्थित होते. इतक्यात कुणीतरी माहिती दिल्यावरून मोहन कुंभारही तेथे आले.
नगराध्यक्षांच्या कार्यालयात आल्यानंतर पुन्हा कुंभार यांनी डॉ. संगेवार यांच्याशी वाद घातला. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी कुंभारांच्या विरोधात घोषणाबाजीस सुरुवात केली. हा प्रकार दहा-पंधरा मिनिटे सुरू असताना चाळके यांनी मध्यस्थी करत सर्वांना शांत केले. चाळके हे पालिकेच्या अधिकाऱ्यांची बाजू घेत असल्याचे पाहून कुंभार यांनी त्यांच्याशी वाद घातला. या वादामध्ये चाळके यांनी मक्तेदारांकडे कुंभार पैसे मागत असल्याचा आरोप केला. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना दादागिरी केली तर मारहाण करण्याची भाषा केली आणि ते कुंभार यांच्या अंगावर गेले. त्यावेळी नगरसेवक कुंभार यांचा मुलगा पवन हा खुर्ची उचलून चाळके यांच्या अंगावर गेला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले नगरसेवक अजित जाधव, मदन झोरे, आदींनी मध्यस्थी करत वाद मिटविला. यावेळीसुद्धा कर्मचारी जोरदारपणे कुंभार यांच्या विरोधात घोषणा देत असल्याने नगराध्यक्षांच्या कार्यालयामध्ये अभूतपूर्व गोंधळ उडाला होता. नगरसेवक जाधव व झोरे यांनी कुंभार यांना शांत करीत नगराध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर काढले.(प्रतिनिधी)
परस्परविरोधी पोलिसांत तक्रारी
माजी नगरसेवक सागर चाळके व नगरसेवक मोहन कुंभार आणि डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्यात झालेल्या बाचाबाचीनंतर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यामध्ये कुंभार यांनी चाळके यांच्यासह अजित जाधव व डॉ. सुनीलदत्त संगेवार या तिघांनी आपला मुलगा पवन व पत्नीला शिवीगाळ करून हाताला धरून हाकलून बाहेर काढल्याचे म्हटले आहे.
तर डॉ. संगेवार यांनी दिलेल्या तक्रारीत कुंभार यांनी आपणास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व शासकीय कामात अडथळा आणला, अशी तक्रार दिली आहे. दोघांचे जबाब घेऊन रात्री उशिरा तक्रार नोंदविण्याचे काम शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होते.