नगरसेवकांचा राजीनामा मागे; रस्ता होणार
By Admin | Updated: November 28, 2014 00:33 IST2014-11-28T00:16:42+5:302014-11-28T00:33:56+5:30
सव्वा कोटी रुपये मनपा खर्च करणार : उद्यापासून रस्ता बंद ठेवणार : सुनीता राऊत

नगरसेवकांचा राजीनामा मागे; रस्ता होणार
कोल्हापूर : रंकाळा टॉवर ते जुना वाशीनाका हा गेली चार वर्षे रखडलेला रस्ता करा, अन्यथा उद्या, शुक्रवारी होणाऱ्या महासभेत राजीनामा देऊ, असा पवित्रा घेतलेल्या माजी महापौर सुनीता राऊत, अरुणा टिपुगडे, परीक्षित पन्हाळकर या नगरसेवकांना दिलासा मिळाला.
याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आज, गुरुवारी महापौर तृप्ती माळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी रस्त्यासाठी येणारा सव्वा कोटी रुपयांचा खर्च महापालिका करेल, असे आश्वासन दिले. आयआरबीने करावयाच्या रस्त्यासाठी व अपूर्ण कामासाठीही नगरसेवकांनी दबाव तंत्राचा वापर करावा, असे आवाहनही आयुक्तांनी या बैठकीत केले.
जुना वाशीनाका ते रंकाळा टॉवर रस्त्यावर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. महापालिका, आयआरबी व रस्ते विकास महामंडळ यांच्यातील त्रिपक्षीय करारानुसार हा रस्ता आयआरबीने करणे बंधनकारक आहे. मात्र, अपेक्षित टोलवसुली नसल्याने हा रस्ता महापालिकेनेच करावा, असे पत्र आयआरबीने मनपा प्रशासनास दिले.
यानंतर वाद सुरू झाला. महासभेपूर्वी रस्त्याचे काम सुरू न केल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला. आज नगरसेवकांची बैठक झाली. बैठकीत राज्य शासनाकडून आलेल्या दोन कोटी साठ लाख रुपयांच्या मूलभूत सुविधा निधीतून हा रस्ता करण्याचे ठरले.
आठवड्यात रस्त्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. उद्या अधिकारी पाहणी करणार आहेत. दरम्यान, रस्त्याचे काम होईपर्यंत रस्ता बंद ठेवणार असल्याची माहिती सुनीता राऊत यांनी दिली. बैठकीस उपमहापौर मोहन गोंजारे, सभापती सचिन चव्हाण, राजेंद्र लाटकर, उत्तम कोराणे, आदी उपस्थित होते.
आयआरबीची २५ कोटी बॅँक गॅरंटी जप्त करून उर्वरित कामे करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी राज्य शासनाशी पत्रव्यवहार केला आहे. बॅँक गॅरंटी मिळविण्यासाठीही नगरसेवकांनी प्रशासनास मदत करावी. - आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी