निधीवरून नगरसेवक-अधिकाऱ्यांत खडाजंगी
By Admin | Updated: January 23, 2016 01:06 IST2016-01-22T23:02:50+5:302016-01-23T01:06:17+5:30
कागल नगरपालिका सभा : ठेकेदारीवरील कर्मचारी कमी करण्याचा निर्णय, एकाच विषयावर तासभर चर्चा

निधीवरून नगरसेवक-अधिकाऱ्यांत खडाजंगी
कागल : पालिकेच्या जनरल फंडाचा उपयोग वाट्टेल तसा केल्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी कागल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल तासभर या एकाच विषयावर नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्यात आरोप-प्रत्यारोप आणि शाब्दिक चकमकी उडाल्या. दरम्यान, पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालल्याने ठेकेदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची
संख्या कमी करण्याबाबत नियोजन करावे, असा निर्णय प्रशासनाने जाहीर केला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गाडेकर होत्या. मुख्याधिकारी प्रभाकर पत्की, उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले व्यासपीठावर उपस्थित होते.घनकचरा प्रकल्प वाढीव खर्च, पाणीपट्टीचे बिलिंग मीटर पद्घतीने वसुली करणे, दुकान गाळ्यांचे लिलाव, पाणीटंचाई, श्रमिक वसाहतीवरील ओढ्यावर झालेले बांधकाम, खासगी सदनिकांमध्ये वाहनतळासाठी जागा नाही, घरफाळा, इतर कर वसुली बद्दलची दिरंगाई, ठेकेदारी कर्मचाऱ्यांवर महिना १४ लाखांचा खर्च, अशा विविध विषयांवर जोरदार चर्चा झाल्या. विरोधी नगरसेवकांबरोबर सत्ताधारी नगरसेवकांनीही गंभीर आक्षेप घेत हरकती नोंदविल्याने गोंधळ वाढतच गेला. नगराध्यक्षा गाडेकर यांना दोन ते तीनवेळा सभागृहाची शिस्त पाळा, अशी विनंती करावी लागली. तर एकवेळा सभागृह सोडून जाते, असे उद्विग्न उद्गार त्यांनी काढले. या सभेत जनलर फंडाचा विषय वादळी ठरला. (प्रतिनिधी)
सभेतील प्रमुख निर्णय
अपंगांसाठी ३टक्के राखीव निधी समान पद्धतीने खर्च करणार
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शहरात मुश्रीफ फौंडेशनच्या माध्यमातून ठिकठिकाणी बोअरवेल मारणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे स्वागत कमान उभारणार
नगरपालिकेच्या मुख्य इमारतींवर सौरउर्जा प्रकल्प उभारणार
जुन्या अग्निशमन गाडीच्या जागी दुसरी नवीन गाडी
खरेदी करणे
ठेकेदारीवरील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार
श्रमिक वसाहतीमधील सभागृहाला आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव देणार
सभेतील आरोप-प्रत्यारोप
विरोधी नगरसेवक भैया इंगळे आणि मुख्याधिकारी प्रभाकर पत्की यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. मुख्याधिकारी पत्की उद्धटपणे बोलल्याचा पुरावा असल्याचे इंगळे म्हणाले, तर आरोप सिद्ध झाला तर आत्मदहन करतो, असे प्रत्युत्तर पत्कींनी दिले.
अॅम्युझमेंट पार्कची बिले देण्याच्या मुद्द्यावर मनोहर पाटील यांनी जोरदार आक्षेप नोंदविताच मुख्याधिकारी पत्की यांनी बिले का व कशासाठी दिली, हे तुम्हाला माहिती आहे. त्याला आमचाही विरोध होता, असे सांगितले.
दुकानगाळ्यांच्या वितरणाबद्दलही नगरसेवकांनी आक्षेप घेतले. प्रवीण गुरव, संजय चितारी, नम्रता कुलकर्णी, मारुती मदारे, आदींनी दुकानगाळे कधी वाटले ते कळत नाही, असे म्हणताच पत्की यांनी तुम्हाला सर्वांना माहिती आहे. राजकीय हस्तक्षेप होतो, असे स्पष्टपणे सांगितले.
पाणीपट्टीचे बिल १ फेब्रुवारीपासून मीटर पद्धतीच्या वसुलीस मनोहर पाटील, संजय कदम यांनी विरोध केला. याबाबत याला विरोध करता येणार नाही, असे नगराध्यक्षांनी सांगितले.