नगरसेवक विरुद्ध कर्मचारी आखाडा
By Admin | Updated: March 19, 2016 00:13 IST2016-03-19T00:11:25+5:302016-03-19T00:13:19+5:30
तर नगरसेवकांना घरात घुसून ठोकणार : देसाई; आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत : देशमुख

नगरसेवक विरुद्ध कर्मचारी आखाडा
कोल्हापूर : आरोग्य निरीक्षक संजयकुमार गेंजगे यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पुकारलेल्या ‘काम बंद’ आंदोलनाबाबत वाटाघाटीसाठी बोलाविलेल्या बैठकीत कर्मचारी संघाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी एकमेकांना धमक्या दिल्याने वातावरण तंग बनले. यापुढे जर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण झाली तर ५० कर्मचाऱ्यांचा एक गट त्या नगरसेवकाच्या घरात घुसून त्याला ठोकून काढतील, अशी धमकी कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी दिली, तर काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी ‘तुम्ही ५० आणाल तर आम्ही ५०० माणसं आणू, आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत,’ अशा शब्दांत धमकी दिली. दरम्यान आंदोलनामुळे महापालिकेची सभा रद्द करण्यात आली.
कोल्हापूर : आरोग्य निरीक्षकास झालेल्या मारहाणीबाबत तडजोड करून मार्ग काढण्यासाठी महापौर अश्विनी रामाणे व आयुक्त पी. शिवशंकर यांनी संयुक्त बैठक आयोजित केली होती; परंतु या बैठकीत कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी दिलेल्या धमकीमुळे सर्वच पदाधिकारी, नगरसेवक संतप्त झाले आणि बैठकीतील वातावरण कमालीचे स्फोटक बनले आणि उघडपणे धमक्या देण्याचे रामायण घडले.
प्रा. जयंत पाटील यांनी गुरुवारच्याच्या प्रकाराबाबत महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह आम्ही सर्वांनी दिलगिरी व्यक्त केली असून, कोणीही नगरसेवक या घटनेचे समर्थन करणार नाही, त्यामुळे प्रशासनाने काय कारवाई करायची ते त्यांनी ठरवावे, आमचा कसलाही आक्षेप असणार नाही, असा खुलासा करत ‘काम बंद’ आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यावर रमेश देसाई यांनी नगरसेवकांच्या नातेवाइकांच्या हस्तक्षेपाचे काय करणार, याचे उत्तर द्या, असा आग्रह धरला. नगरसेविकांचे पती अथवा त्यांचा मुलगा जर सरळ मार्गाने कर्मचाऱ्यांना सूचना करीत असेल तर त्यात काही गैर नाही, असे प्रा. पाटील म्हणाले; परंतु या उत्तराने समाधान न झालेल्या रमेश देसाई यांनी ‘जर कोणी कर्मचाऱ्यांना मारहाण करणार असेल, तर मग आम्ही ५० कर्मचाऱ्यांचा एक गट त्या नगरसेवकाला त्यांच्या घरात घुसून ठोकणार,’ अशी थेट धमकी दिली. त्यामुळे बैठकीतील वातावरण कमालीचे तणावपूर्ण बनले. प्रकरण ‘हमरी-तुमरी’वर पोहोचले.
नगरसेवक कमलाकर भोपळे, नियाज खान, अभिजित चव्हाण, शारंगधर देशमुख यांनी तर आक्रमक रूप धारण करीत कर्मचाऱ्यांची ही सरळ-सरळ धमकी असून, ‘शब्द’ मागे घ्यावेत, असा आग्रह धरला. हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून आम्ही जनतेच्या सेवेसाठी निवडून आलोय, त्यामुळे असली दादागिरीची भाषा अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा कमलाकर भोपळे यांनी दिला. नियाज खान यांनीही ‘अस्सल कोल्हापुरी भाषेत’ रमेश देसाई यांच्यावर शाब्दिक वार केला, तर शारंगधर देशमुख यांनी, ‘तुम्ही ५० कर्मचारी आणणार असाल तर आम्ही ५०० माणसं आणू, आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत,’ अशा शब्दांत दम दिला. देसाई यांच्या धमकीमुळे नियाज खान, कमलाकर भोपळे, अभिजित चव्हाण यांनी कसलीही चर्चा न करता बैठकीतून बाहेर पडा, असा आग्रह अन्य पदाधिकाऱ्यांकडे धरू लागले; पण त्यांना महापौर रामाणे,
प्रा. पाटील यांनी शांत केले.
प्रशासनावर आरोप
शारंगधर देशमुख यांनी बैठकीत प्रशासनावर थेट आरोप केला. नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही, वरिष्ठांच्या कानावर घातले तरी ते काहीच कारवाई करीत नाहीत. कर्मचारी - नगरसेवकांत प्रशासनातील अधिकारी भांडणे लावून बघत बसतात. तुमच्यामुळे अशा घटना घडत आहेत, असे देशमुख म्हणाले. कर्मचारी नाहीत, टँकर मिळत नाहीत, औषध फवारणी होत नाही, याबाबत लेखी पत्र देऊनसुद्धा आयुक्तांनी काहीच कार्यवाही केली नाही, त्यामुळे मग कर्मचाऱ्यांवर राग व्यक्त होतो, असे संभाजी जाधव म्हणाले.
नगरसेवकांवर हल्लाबोल
‘काम बंद’ आंदोलनात सहभागी झालेले सर्व कर्मचारी मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जमले होते. तेथे झालेल्या सभेत अनेक कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांवर हल्लाबोल चढविला. ‘जर का यापुढे शिवीगाळ अथवा मारहाण झाली, तर हातातील झाडूने ठोकून काढले जाईल,’ अशी चिथावणीखोर भाषा वापरली. कर्मचारी संघाच्या कार्यालयात काही पदाधिकारी जात असताना कर्मचाऱ्यांनी त्यांना उद्देशून काही ‘अपशब्द’ही वापरले होते. त्यामुळे अनेक नगरसेवक संतप्त झाले होते. त्यांचा राग वाटाघाटीच्या बैठकीत उफाळून आला.
नगरसेवकांनी वाचला पाढा
पदाधिकारी व नगरसेवकांनी या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा पंचनामा केला. प्रत्येक प्रभागात आठ ते दहाच कर्मचारी आहेत, परंतु त्यातील चार ते पाचच कामाला उपलब्ध होतात. तेही वेळेवर काम करत नाहीत. सकाळी दहा वाजले तरी कचरा उठावाचे काम होत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तरी ते ऐकत नाहीत. मग काही कामे असतील तर आम्ही कोणाला सांगायची, अशी विचारणा नगरसेवकांनी यावेळी केली. त्यावेळी आयुक्त पी. शिवशंकर यांनी जर काही तक्रारी असतील तर कायदा हातात न घेता थेट वरिष्ठांकडे
तक्रार करा, संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
आंदोलन मागे, तरीही मनपा बंदच
सुमारे तीन तास झालेल्या तडजोडीच्या बैठकीत पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, अशी ग्वाही महापौर यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर दुपारी अडीच वाजता कर्मचाऱ्यांनी त्यांचे ‘काम बंद’ आंदोलन मागे घेतले; परंतु आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे आवाहन केल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावर जावे, असे न सांगता सर्वांनी घरी जावे, असे सांगण्यात आले. त्यामुळे ‘काम बंद’ आंदोलन मागे घेतल्यानंतरही महानगरपालिका कार्यालय दुपारच्या पुढे बंदच राहिले.
कामगार आहोत की गुलाम ?
नव्या सभागृहात बहुसंख्य नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना कर्मचाऱ्यांशी कशा प्रकारे संवाद साधावा, त्यांच्याशी आपले वर्तन कसे असावे, याबाबत कसलीच कल्पना नाही. प्रभागातील कामे करण्यासाठी त्यांनी उत्साहापोटी दोन-चार स्वीय सहायक नेमले आहेत. आतापर्यंत नगरसेविकेच्या पतीच्या सूचना ऐकणे कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना माहीत होते; परंतु आता या स्वीय सहायकांच्या सूचनाही ऐकाव्या लागत आहेत. कर्मचारी ऐकतात म्हटल्यावर हे स्वीय सहायक आता नगरसेवकांच्या भूमिकेतच वागायला लागले आहेत. कर्मचाऱ्यांना वाटेल त्या भाषेत बोलायला लागले आहेत. त्यामुळेच नगरसेवक आणि कर्मचारी यांच्यातील मतभेदाची दरी वाढत चालली आहे. शुक्रवारी महापालिकेसमोर झालेल्या सभेत कर्मचाऱ्यांचा राग एवढा उफाळून आला आणि त्याने ‘अरे आम्ही कर्मचारी आहोत की गुलाम?’ असा सवाल केला.
महापौरांची दिलगिरी
संजयकुमार गेंजगे यांना झालेल्या शिवीगाळ व मारहाणप्रकरणी महापौर अश्विनी रामाणे यांनी बैठकीत दिलगिरी व्यक्त केली आणि कर्मचाऱ्यांना ‘काम बंद’ आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. तर आयुक्त पी. शिवशंकर यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन करण्यात येईल, असे सांगितले. तसेच जे कर्मचारी काम करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला.
महापालिका सभा अखेर रद्द
कोल्हापूर : महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे शुक्रवारी होणारी मनपाची सर्वसाधारण सभा अखेर रद्द करावी लागली. आता ही सभा ३१ मार्चला घेण्यात येणार असल्याचे महापौर अश्विनी रामाणे यांनी सांगितले. नगर सचिव कार्यालयास कुलूप होते. अनेक फाईल त्यात अडकलेल्या होत्या. सभेचे इतिवृत्तांत तयार करणारे स्टेनोही आंदोलनात सहभागी झाले होते. एकीकडे सर्व नगरसेवक सभागृहात येऊन बसत असताना कर्मचारी नसल्याने सभेचे कामकाज सुरू करण्यात अडचणी होत्या. महापौर रामाणे या आंदोलन संपवून सभा घेण्याच्या विचारात होत्या, पण त्यांना ते शक्य झाले नाही. महापौर रामाणे व आयुक्त पी. शिवशंकर यांच्या वाहनावरील चालक वगळता अन्य अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवरील चालकांनी आंदोलनात भाग घेतला. त्यामुळे पदाधिकारी, अधिकारी स्वत:च्या वाहनातून दाखल झाले.
कर्मचारी संघाच्या कार्यालयातच हमरी-तुमरी
कोल्हापूर : मारहाण करणाऱ्या नगरसेवकाच्या भावावर काय कारवाई केली. ते प्रथम सांगा, अशा शब्दांत महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी नगरसेवकांना बैठकीत सुनावले, तर याच बैठकीत नगरसेवक सत्यजित कदम व इस्टेट अधिकारी संजय भोसले यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले. शनिवार पेठेतील मिंच गल्लीत महानगरपालिका कर्मचारी संघाच्या कार्यालयात दुपारी स्थायी सभापती मुरलीधर जाधव, प्रा. जयंत पाटील, गटनेते शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, नियाज खान, सुनील पाटील, संभाजी जाधव, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, विजय वणकुद्रे, माजी आमदार सुरेश साळोखे यांच्यासह अधिकारी नगरसेवक यांच्या उपस्थितीत काम बंद आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली; पण बैठकीत ठोस निर्णय झाला नाही. प्रा. जयंत पाटील यांनी, आम्ही या घटनेचे समर्थन करत नसून कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली. त्यावर रमेश देसाई यांनी गेल्या पाच महिन्यांत मी आयक्त पी. शिवशंकर यांना कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या या प्रकाराबद्दल तसेच नोकर भरतीबद्दल भेटलो आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे सांगितले.
संजय भोसले, सत्यजित कदम यांच्यात जुंपली
सर्वसाधारण सभेवेळी एखाद्या नगरसेवकाने अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यावर तीच चौकट वर्तमानपत्रात छापून येते. त्याचा त्रास त्या अधिकाऱ्याच्या कुटुंबाला सहन करावा लागत आहे. तसेच त्याच्या नातेवाइकांमध्ये चुकीचा संदेश जातो, असे इस्टेट अधिकारी संजय भोसले यांनी बैठकीत सांगीतले. त्यावर सत्यजित कदम यांनी, सभागृहात एखादा नगरसेवक तथ्य असल्याशिवाय अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत नाही. आता माझ्याच प्रभागात एका कनिष्ठ अभियंत्याने काम करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी त्या व्यक्तीकडे केली असल्याचे कदम यांनी सांगितले. त्यावर भोसले यांनी याबाबत ‘तुम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करा’, असे म्हटल्यावर सत्यजित कदम यांचा पारा चढला. त्यामुळे बैठकीतील वातावरण तापले. ५
विशाल दिंडोर्लेवर गुन्हा
कोल्हापूर : आरोग्य निरीक्षक संजयकुमार गेंजगे यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांचे बंधू विशाल उर्फ पप्पू आनंदराव दिंडोर्ले यांच्या विरोधात शुक्रवारी जुनाराजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.