नगरसेवक रवींद्र माने यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
By Admin | Updated: February 25, 2015 00:45 IST2015-02-25T00:42:31+5:302015-02-25T00:45:01+5:30
पक्षविरोधी कामाबद्दल कारवाई : पक्षप्रतोदपदी विठ्ठल चोपडे यांची नियुक्ती

नगरसेवक रवींद्र माने यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
इचलकरंजी : विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे येथील नगरपालिकेमधील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद रवींद्र माने यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. आणि त्यांच्या जागी पक्षप्रतोद म्हणून विठ्ठल चोपडे यांची नियुक्ती केली असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सचिव मदन कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल चोपडे हे नगरपालिकेमध्ये पक्षाच्या व जनहिताच्या विरोधात सातत्याने काम करीत आहेत. म्हणून चोपडे यांचे तात्पुरते निलंबन करावे, अशा आशयाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रवींद्र माने होते. मात्र, ही बैठक २२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती; पण त्यापूर्वीच २० फेब्रुवारीला रवींद्र माने यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असल्याचे आदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एका पत्रान्वये राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा समितीला कळविले होते. त्यामुळे चोपडे यांच्यावर कसलीही कारवाई होण्याचा संबंधच नाही, असे स्पष्ट करून सचिव कारंडे म्हणाले, त्यापाठोपाठ जिल्हा कॉँग्रेस समितीनेही रवींद्र माने यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा विषद करण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या राज्यस्तरावर लोणावळा व बालेवाडी-पुणे येथे दोन बैठका झाल्या. या बैठकांमध्ये राज्यस्तरावरील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्हा, शहर व ग्रामीण स्तरावरील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. या दोन बैठकांमध्ये निवडणुकीच्या पराभवाविषयी विचार मंथन करण्यात आले. निवडणुका हा पक्षाच्या परीक्षेचा काळ असतो. या काळात पक्षाचा वापर केवळ स्वार्थासाठीच करणाऱ्या मंडळींवर कडक कारवाई करण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला. त्याप्रमाणे इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार कारंडे यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेले सूत्रधार रवींद्र माने यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असल्याचेही कारंडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
कारवाईला तात्पुरती स्थगिती
माजी खासदार निवेदिता माने यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री माजी आमदार व नगरसेवक अशोकराव जांभळे, रवींद्र माने, महेश ठोके, नितीन जांभळे यांच्यासह सहा नगरसेवकांची बैठक झाली. पालिकेतील घडामोडींबाबत आणि माने यांच्यावरील निलंबनाबाबत निवेदिता माने यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केली. तटकरे यांनी कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे. याबाबतचे पत्र गुरुवारी (२६ फेब्रुवारी) प्राप्त होणार असल्याचे माजी खासदार माने यांनी दूरध्वनीवरून सांगितले.