नगरसेविकेने ठोकले कार्यालयास टाळे
By Admin | Updated: June 23, 2015 00:19 IST2015-06-23T00:19:52+5:302015-06-23T00:19:52+5:30
महापालिका : ताराराणी कार्यालयाचा व्यवहार ठप्प

नगरसेविकेने ठोकले कार्यालयास टाळे
कोल्हापूर : शिवाजी पार्क परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या कारणास्तव सोमवारी ताराराणी विभागीय कार्यालयास नगरसेविका अपर्णा आडके यांनी टाळे ठोकले. प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत झाल्याखेरीज टाळे न काढण्याचा निर्धार आडके यांनी घेतल्याने येथील घरफाळा, बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचे कामकाज ठप्प झाले. दरम्यान, टाळे ठोकण्याच्या प्रकाराबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी ‘लोकमत’ला दिली. शिवाजी पार्क परिसरात अनेक महिने अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. तो सुरळीत करण्याबाबत आडके यांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. मात्र, सुधारणा झाली नाही. त्यामुळे आडके यांनी रविवारी (दि. १४) सायंकाळी ताराराणी चौकातील पाणीपुरवठा विभागास कुलूप लावले होते. मात्र, कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी कुलूप तोडून कामकाज सुरू केले. यानंतर संतप्त झालेल्या आडके यांनी ताराराणी विभागीय कार्यालयाच्या दोन्ही मुख्य दरवाजांना कुलूपे लावले. परंतु, कार्यालयास टाळे पाहून नागरिकांना परत जावे लागले. आडके यांनी लावलेले कुलूप काढावे, अशी विनंती उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी केली. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत झाल्याखेरीज कुलूप काढणार नाही, असे आडके यांनी सांगितले. यानंतर विभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी ताराराणी अग्निशमन शाखेसमोरील महापालिकेच्या सभागृहात दिवसभर बसून होते. टाळे ठोकल्याबाबत आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त विजय खोराटे व जलअभियंता मनीष पवार यांना माहिती देण्यासाठी फोन केला. मात्र, तिघांनीही फोन घेतला नाही. आयुक्तांना एसएमएस पाठविल्यानंतर खोराटे व पवार यांचा फोन आला. त्यांनी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. पण जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत कुलूप काढणार नाही, असे अपर्णा आडके यांनी स्पष्ट केले. कार्यालयास टाळे ठोकणे ही घटना योग्य नाही. निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार वारंवार घडण्याची शक्यता आहे. आज, मंगळवारी कार्यालयाचे कुलूप फोडून कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले. अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांत तक्रार केली जाईल. - नितीन देसाई, अतिरिक्त आयुक्त.