कोल्हापूर २०० कोटींचा कॉर्पोरेट गणेशोत्सव
By Admin | Updated: September 1, 2014 00:28 IST2014-09-01T00:24:17+5:302014-09-01T00:28:36+5:30
प्रसिद्ध मंडळे कंपन्यांच्या रडारवर : प्रायोजकत्वापोटी मोठी किंमत; महापालिकेच्या हक्काच्या उत्पन्नावर मात्र गदा

कोल्हापूर २०० कोटींचा कॉर्पोरेट गणेशोत्सव
संतोष पाटील - कोल्हापूर -गणेशोत्सव फिव्हर कॅच करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या जाहिरातीसाठी मंडळांच्या माध्यमातून उतरल्याने मुंबई-पुण्याप्रमाणेच कोल्हापूरच्या गणेशोत्सवास आता कॉर्पोरेट स्वरूप आले आहे. जाहिरातीपोटी मोठमोठ्या रकमा या कंपन्यांनी मंडळांना मोजल्या आहेत. आरास, रंगरंगोटीपासून मुहूर्तावरील खरेदी तसेच सार्वजनिक मंडळांकडून होणारा कोट्यवधींचा खर्च यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातील उलाढाल २०० कोटी रुपये होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने इच्छुकांनीही हात ढिले केल्याने मंडळांची चंगळ सुरू आहे.
कोल्हापूर शहरात धर्मादाय कार्यालयाकडील आकडेवारीनुसार ३,२९५ तरुण मंडळे आहेत. किमान २५ हजारांपासून दहा लाख रुपयांपर्यंत ही मंडळे उत्सवासाठी खर्च करतात. ग्रामीण भागात दोन हजारांहून अधिक मंडळे आहेत. ही मंडळे सरासरी खर्च १० ते ५० हजार रुपये उत्सव काळात खर्च करतात, अशी माहिती धर्मादाय आयुक्तकार्यालयात मंडळांनी जमा केलेल्या हिशेबावरून समजते. जिल्हा नियोजन आराखड्यानुसार कुटुंबांची संख्या ८ लाख ८० हजार आहे. यातील तब्बल पाच लाखांहून अधिक कुटुंबे घरगुती गणेशोत्सव साजरा करतात. आरास, रंगरंगोटी, सजावट आदींसाठी प्रती कुटुंब सरासरी दोन हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च करतात. याव्यतिरिक्त कपडे, घरगुती साहित्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी होणारा खर्च वेगळाच आहे. यंदाच्या उत्सवकाळात होणारी एकूण उलाढाल दोनशे कोटींपेक्षा अधिक असेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
साहित्य, सिमेंट, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या मोठ्या जाहिराती
३२९५ तरुण मंडळांंची नोंद
३३५हून अधिक चौकांत जाहिराती
दीड हजाराहून अधिक कमानी
लाखोंच्या महसुलाला ठेंगा
करबुडव्या कंपन्यांवर फौजदारीचा बडगा
काही कंपन्यांनी प्रामाणिकपणे परवानगी घेतली आहे. बहुतांश कंपन्यांनी पूर्ण तपशील अद्याप दिलेला नाही. याबाबत सर्वेक्षण सुरू आहे. सार्वजनिक क्षेत्र विद्रुपीकरण कायदा २००५ नुसार परवानगीशिवाय जाहिराती करणाऱ्या कंपन्यांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नोटिसीला वेळेत व पूरक उत्तरे न देणाऱ्या कंपन्यांवर महापालिका फौजदारी दावे दाखल करणार आहे.
- नेत्रदीप सरनोबत
(शहर अभियंता)