Coronavirus Unlock : शिक्षक सोमवारपासून शाळेत जाणार, शैक्षणिक वर्ष सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:15 PM2020-06-09T12:15:18+5:302020-06-09T12:16:57+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक हे सोमवार (दि. १५) पासून शाळेत उपस्थित राहणार आहेत. त्या दिवसापासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. राज्य शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास कोणीही सक्ती करू नये, अशी मागणी शैक्षणिक व्यासपीठाने यावेळी केली.
कोल्हापूर : जिल्ह्यातील शिक्षक हे सोमवार (दि. १५) पासून शाळेत उपस्थित राहणार आहेत. त्या दिवसापासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. राज्य शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास कोणीही सक्ती करू नये, अशी मागणी शैक्षणिक व्यासपीठाने यावेळी केली.
मुख्याध्यापक, शिक्षकांनी चालू शैक्षणिक वर्षाचे नियोजन करावे. विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप आपल्या सोयीनुसार शालेयस्तरावर करावे. क्वारंटाईनसाठी ज्या शाळा प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत, त्या शाळा निर्जंतुकीकरण करून आपल्या ताब्यात दिल्याशिवाय व शासनाचा आदेश मिळाल्याशिवाय त्यांचा वापर करू नये. कोविडच्या कामासाठी सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना कर्तव्यातून मुक्त झाल्यावर १४ दिवस होम क्वारंटाईन झाल्यानंतर शाळेत उपस्थित राहावयास सांगणे, आदींबाबत बैठकीत चर्चा झाली.
यावेळी व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, प्रा. जयंत आसगावकर, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे, उदय पाटील, मिलिंद पांगिरेकर, राजेश वरक, मिलिंद बारवडे, अशोक हुबळे, रवींद्र मोरे, गजानन काटकर, आदी उपस्थित होते. दत्ता पाटील यांनी आभार मानले.
वेतन अनुदानासाठी पालकमंत्र्यांना भेटणार
शाळांचे वेतनेत्तर अनुदान हे बीडीएसच्याअभावी परत गेल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले. ते अनुदान परत मिळविण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.