सीपीआरमधील अतिक्रमणामुळे कोरोनाचा फैलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:16 IST2021-06-30T04:16:52+5:302021-06-30T04:16:52+5:30

कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालय आवारातील अनधिकृत चहा, नाष्ट, झेरॉक्स सेंटरच्या अतिक्रमणामुळे कोरोना आजाराचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत ...

Coronal proliferation due to encroachment in CPR | सीपीआरमधील अतिक्रमणामुळे कोरोनाचा फैलाव

सीपीआरमधील अतिक्रमणामुळे कोरोनाचा फैलाव

कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालय आवारातील अनधिकृत चहा, नाष्ट, झेरॉक्स सेंटरच्या अतिक्रमणामुळे कोरोना आजाराचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय ऑक्सिजनच्या पाईपजवळच चहाच्या टपऱ्यांमुळे भविष्यात मोठी दुर्घटनेची शक्यता आहे. यामुळे अतिक्रमण काढावे, अशा आशयाचे पत्र अधिष्ठाता एस. एस. मोरे यांनी करवीरच्या प्रांताधिकाऱ्यांना दिले. हे पत्र देऊन एक महिना होत आला तरी अजूनही प्रत्यक्षात अतिक्रमणावर हातोडा पडलेला नाही. यामुळे महसूल प्रशासनावर कोणाचा तरी दबाव असल्याचा संशय निर्माण झाला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांच्यावरील उपचारासाठी सीपीआर रुग्णालय राखीव ठेवण्यात आले आहे. या रुग्णालय परिसरात चहा, नाष्टाच्या टपऱ्यांसह विविध प्रकारची १४ आस्थापने अतिक्रमित आहेत. येथे कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांची वर्दळ वाढली आहे. अतिक्रमणामुळे ती रोखणे सीपीआर प्रशासनास अशक्य बनले आहे. कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज वाढल्याने सीपीआर परिसरात ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून पाईप लाईनद्वारे रुग्णांच्या ४८० बेडपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. ऑक्सिजन ज्वालाग्राही आहे. तरीही ऑक्सिजनच्या पाईपखालीच चहाच्या टपऱ्या आहेत. सिलिंडरचा वापर टपरीवर केला जातो. टपरीला आग लागल्यास ऑक्सिजन पुरवठ्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. अतिक्रमणाच्या टपऱ्यांमुळे सीपीआर परिसरात रुग्णवाहिका, शववाहिकेलाही अडथळा निर्माण होत आहे. इतके गंभीर असतानाही अतिक्रणधारकांवर मेहरनजर ठेवण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील यांनी ते अतिक्रमण हटवण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. त्याची दखल घेत अधिष्ठातांनी करवीरच्या प्रांताधिकाऱ्यांकडे १४ अतिक्रमणधारकांच्या नावासह यादी देऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याच पत्रात त्यांनी चहाची टपरी, नाष्ट सेंटरमुळे कोरोना प्रसार होऊ शकतो. ऑक्सिजनच्या पाईपलाई धोका असल्याकडे लक्ष वेधले आहे. तरही महसूल प्रशासन नेहमीप्रमाणे वेळाकाढू धोरण अवलंबले आहे.

चौकट

सीपीआर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार १४ अतिक्रमणे अशी : विश्वास उपहारगृह (सार्वजनिक बांधकाम कार्यालयाजवळ), कोल्हापूर जिल्हा हॉस्पिटल, कर्मचारी चतुर्थ श्रेणीच्या कायम नोकराची सोसायटी (लोअर कोरोना विभाग शेजारी), शिवसंदेश झेरॉक्स सेंटर (रुग्णालयाच्या ओपीडी विभागासमोर), के. एफ. सी. झुणका भाकर केंद्र (एक्सरे रूमच्या शेजारी), रिपब्लिकन फाउंडेशनतर्फे येागेश कॅन्टीन (नेत्र विभागाशेजारी), पृथ्वी नारळ पाणी, मोसंबी ज्यूस गाडी (नेत्र विभागाशेजारी), आदर्श जनरल स्टोअर्स, प्रथमेश टी स्टॉल (प्रसूती विभागासमोर), छत्रपती प्रमिलाराजे टी स्टॉल (मुख्य शस्त्रक्रिया विभागाजवळ), कोल्हापूर टी स्टॉल (जिल्हा शल्यचिकित्सक केबीनमागे), आर. के. गॅस कॅन्टीन (ब्लड बँकेच्या इमारतीत), महाराज नाष्टा सेंटर (लोअर कोरोना विभागाजवळ), महाराष्ट्र गर्व्हेमेंट नर्सेस असोसिएशन (एक्सरे रूमच्या मागे), एस. एस. टी स्टॉल सेंटर आणि नाष्टा सेंटर (मानसोपचार रुग्णालयाच्या शेजारी).

कोट

सीपीआर रुग्णालय आवारातील अतिक्रमणधारकांची सुनावणी घेतली जात आहे. नोटिसाही दिल्या आहेत. पुढील सुनावणी १२ जुलैला होणार आहे.

-वैभव नावडकर, प्रांताधिकारी

सीपीआरमधील अतिक्रमण काढण्याकडे महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अतिक्रमण आहे हे जगजाहीर असताना पुन्हा प्रांताधिकारी सुनावणी घेत अतिक्रमणधारकांना अभय देत आहेत.

-सतीश पाटील, तक्रारदार, सामाजिक कार्यकर्ते

(फोटो देत आहे)

Web Title: Coronal proliferation due to encroachment in CPR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.