कोरोना काळातील खरेदी आरोपाबाबत कोटीचा दावा दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST2021-03-09T04:26:38+5:302021-03-09T04:26:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेने कोरोना काळातील खरेदी ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील अधिकाऱ्यांच्या समितीने केली आहे. असे ...

कोरोना काळातील खरेदी आरोपाबाबत कोटीचा दावा दाखल करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषदेने कोरोना काळातील खरेदी ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील अधिकाऱ्यांच्या समितीने केली आहे. असे असताना यामध्ये ३५ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप उत्तूरच्या भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. याबाबत संबंधितांनी पंधरा दिवसांत जाहीर माफी मागावी, अन्यथा एक कोटीचा बदनामीचा दावा गडहिंग्लज न्यायालयात दाखल करू, असा इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी पत्रकातून दिला.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. गोरगरीब, सामान्य, दलित, कष्टकरी जनता हिमालयासारखी त्यांच्यामागे आहे. कोणाच्या मेहरबानीमुळे त्यांना हे यश लाभलेले नाही. जलसंपदा खाते सहा महिने मिळाल्यानंतर जमिनीला पर्याय म्हणून त्यांनी हेक्टरी ३६ लाखांचा प्रस्ताव आणला. भाजपच्या काळात एक थेंबही पाणी धरणात साठवले नाही; परंतु संघर्ष करून सुधारित प्रशासकीय मान्यतेतून २२७ कोटी मंजूर करून आणले. पुनर्वसनाबाबत अनेक बैठक घेतल्या आणि आता प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाल्याशिवाय मंत्री हसन मुश्रीफ हे स्वस्थ बसणार नाहीत. ते आमदार नसते आणि प्रयत्न केले नसते तर आंबेओहोळ प्रकल्प दुर्बिणीतून शोधावा लागला असता, असे सतीश पाटील यांनी म्हटले आहे.
गोरगरीब जनतेच्या वेठबिगारीतून बांधलेला मुरगूडचा तलाव समरजित घाटगे यांनी जनतेच्या मालकीचा करावा. उन्हाळ्यात मुरगूडच्या जनतेच्या पिण्याच्या पाण्याची अडचण दूर करून त्या जनतेचा आशीर्वाद घ्यावा. तसेच, त्यांनी हजारो एकर जमिनींपैकी काही जमीन या प्रकल्पग्रस्तांना देऊन त्यांनी औदार्य दाखवावे, असेही पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.