corona virus : न थकता नऊ महिला प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी घेताहेत स्राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 06:36 PM2020-09-14T18:36:02+5:302020-09-14T18:48:44+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने कहर माजविला असताना शेंडा पार्क येथे उभारलेल्या कोविड तपासणी प्रयोगशाळेत जिल्हा हिवताप कार्यालयाकडील नऊ महिला प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गेल्या सात महिन्यांपासून स्रावांचे नमुने संकलन करीत आहेत. जिल्ह्यात या कार्यालयाकडील ५३ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी न थकता संसर्गाचा धोका पत्करून हे काम करीत आहेत. ​​​​​​​

Corona virus: Laboratory scientific officers are also taking secretion samples | corona virus : न थकता नऊ महिला प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी घेताहेत स्राव

कोल्हापुरातील शेंडा पार्क येथील कोविड प्रयोगशाळेत स्रावांची तपासणी करताना हिवताप कार्यालयाकडील प्रयोगशाळा वैज्ञानिक महिला अधिकारी.

Next
ठळक मुद्देप्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीही घेताहेत स्रावांचे नमुनेशेंडा पार्कात तब्बल नऊ महिला कार्यरत, सात महिन्यांपासून ५३ जण तैनात

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने कहर माजविला असताना शेंडा पार्क येथे उभारलेल्या कोविड तपासणी प्रयोगशाळेत जिल्हा हिवताप कार्यालयाकडील नऊ महिला प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गेल्या सात महिन्यांपासून स्रावांचे नमुने संकलन करीत आहेत. जिल्ह्यात या कार्यालयाकडील ५३ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी न थकता संसर्गाचा धोका पत्करून हे काम करीत आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या विषाणूला सामोरे गेले आहेत. छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत संसर्गाचा धोका पत्करून १० कर्मचारी कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय गेले सात महिने दोन शिफ्टमध्ये स्राव तपासणीचे काम करीत आहेत. महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भीम बोरगावे यांनी ही माहिती दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध कोविड काळजी केंद्रांत जिल्हा हिवताप कार्यालयाकडे काम करणाऱ्या एकूण ५३ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांना कोरोनाच्या कामासाठी, विशेषत: घशाचे स्राव घेण्यासाठी जिल्ह्यातील ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तैनात करण्यात आले. यामध्ये तब्बल २६ महिला कर्मचारी आहेत. शेंडा पार्क येथील कोविड प्रयोगशाळेत यांपैकी दहाजण काम करीत आहेत. त्यांतील नऊजण महिला आहेत.

जिल्हा हिवताप कार्यालयाकडील फक्त १२ जणांना कोविड स्राव घेण्यासंदर्भातील कामाचे प्रशिक्षण दिले होते. मात्र शेंडा पार्कात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रशिक्षण दिलेले नाही. कार्यालयाकडील चार अधिकारी त्यांच्या नियमित कामासाठी राखीव आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी दिली.

 

Web Title: Corona virus: Laboratory scientific officers are also taking secretion samples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.