आता खासगी हॉस्पिटलमध्येदेखील मिळणार कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:58+5:302021-07-14T04:27:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोना महामारीवर लसीकरण प्रभावी उपाय असून, अधिकाधिक नागरिकांना लस मिळणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने ...

आता खासगी हॉस्पिटलमध्येदेखील मिळणार कोरोना लस
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोना महामारीवर लसीकरण प्रभावी उपाय असून, अधिकाधिक नागरिकांना लस मिळणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने शहरातील खासगी हॉस्पिटलला लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात येणार असून, जे डॉक्टर इच्छुक असतील, त्यांना मंजुरी मिळणार आहे. तसेच उद्योजकांनी कामगारांची दर पंधरा दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक आहे; अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय नगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिकेच्या सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार परिस्थितीसंदर्भात सोमवारी शहरातील प्रमुख डॉक्टर व उद्योजक यांच्यासोबत आढावा बैठक घेण्यात आली. सध्या लसीकरण केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने गर्दी होत असून, नागरिकांचे विनाकारण हाल होत आहेत. कोरोनावर लसीकरण प्रभावी उपाय असल्याने लसीकरणावर भर देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या २१ जूनच्या निर्णयानुसार एकूण डोसपैकी २५ टक्के खासगीकरणाद्वारे लसीकरणास परवानगी आहे. गॅलेक्सी, सरस्वती व स्पंदन या तीन हॉस्पिटलला परवानगी दिली आहे. आणखीन पंधरा हॉस्पिटलनी मागणी केली असून, आवेदन पत्र देऊन जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा लसीकरण अधिकारी यांची परवानगी घेऊन त्यांना मंजुरी दिली जाणार आहे.
शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक कामगारांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. सायझिंग, प्रोसेसर्स, यंत्रमागधारकांनी कामगारांची दर पंधरा दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. सुरुवातीस पालिकेतर्फे चाचणी करण्यात येणार असून, त्यानंतर उद्योजकांनी स्वखर्चाने चाचणी करून घ्यायची आहे. कामगारांनी चाचणी न केल्याचे आढळल्यास संबंधितांवर ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई किंवा उद्योग सील करण्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे सक्त आदेश आहेत. सोमवारपासूनच याला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, नगराध्यक्षा अलका स्वामी, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, नगरसेवक सागर चाळके, विनय महाजन, प्रमोद म्हेत्तर, प्रकाश गौड, श्रीनिवास बोहरा, राजगोंडा पाटील, पुंडलिक जाधव, संदीप मोघे, डॉ. सुरेश देशपांडे, डॉ. कुबेर मगदूम, डॉ. आर. बी. चावरे, डॉ. अरुण पाटील यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
फोटो ओळी
१२०७२०२१-आयसीएच-० ७
इचलकरंजी पालिकेच्या सभागृहात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख डॉक्टर व उद्योजक यांच्यासोबत आढावा बैठक घेण्यात आली.