कोल्हापुरात कोरोना लसीकरणाचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST2021-01-17T04:21:23+5:302021-01-17T04:21:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : काहीशी धाकधूक, कुतूहल तरी कोरोनावर मात करायचीच असा चंग बांधत उत्साही व जल्लोषी वातावरणात ...

कोल्हापुरात कोरोना लसीकरणाचा श्रीगणेशा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : काहीशी धाकधूक, कुतूहल तरी कोरोनावर मात करायचीच असा चंग बांधत उत्साही व जल्लोषी वातावरणात शनिवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला कोल्हापुरकरांनी प्रतिसाद दिला. मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांच्यासह प्रमुख लोकप्रतिनिधी , अधिकाऱ्यांनी स्वत: केंद्रावर उपस्थित राहून उत्साह वाढवला. लस टोचून घेणाऱ्यांचे फुले देऊन अभिनंदनही केले. केंद्रावर रांगोळ्यासह, सजावट करुन लसीकरणाचा पहिला दिवस आनंदमयी केला.
गेले दहा महिने देशात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी ऑक्सफर्ड संशोधित व पुण्याच्या सिरम कंपनीद्वारे उत्पादित कोविडशिल्ड या लसीकरणास शनिवारपासून देशभरात एकाच वेळी सुरुवात झाली. पंतप्रधानांनी दिल्लीतून संबोधन केल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरणात सुरुवात झाली. नियोजनाप्रमाणे पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लस टोचली जाणार असल्याने केंद्रावर तशी व्यवस्था करण्यात आली होते. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत शहर व जिल्ह्यातील एकूण ११ केंद्रावर प्रत्येकी १०० यापैकी ११०० जणांचे लसीकरण करण्यात आले.
लसीकरण केंद्राचा परिसर रांगोळ्या, फुगे आणि फुलांनी सजवला होता. सेवा रुग्णालयातील वातावरण तर जल्लोषी होते.
चौकट ०१
अक्षता माने ठरल्या पहिल्या लाभार्थी
कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयातील अक्षता विक्रम माने या आरोग्य कर्मचारी महिला कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली लाभार्थी ठरल्या. विशेष म्हणजे शनिवारी त्यांचा वाढदिवस होता. लसीकरणानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
चौकट ०२
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिग्लज, कागल तर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ ग्रामीण रुग्णालयात केलेल्या लसीकरण केंद्राला भेटी देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. खासदार धैर्यशील माने यांनी आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांच्यासमवेत इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात जाऊन लसीकरण करुन घेतलेल्यांचा सत्कारही केला.
चौकट ०३
सेवा रुग्णालयात स्वत: जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते. लसीकरणानंतर त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांसह हात उंचावून जल्लाेष केला. लस टोचून घेणाऱ्यांचाही प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.