आजपासून ‘सुपरस्प्रेडर’ची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:25+5:302021-07-07T04:31:25+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीतील सरसकट सर्वच दुकाने, व्यवसाय सुरू झाला असल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढू नये म्हणून बाजारपेठेतील ‘सुपरस्पेडर’ ...

आजपासून ‘सुपरस्प्रेडर’ची कोरोना चाचणी
कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीतील सरसकट सर्वच दुकाने, व्यवसाय सुरू झाला असल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढू नये म्हणून बाजारपेठेतील ‘सुपरस्पेडर’ असलेल्या विक्रेते, फेरीवाले, दुकानदार यांच्या कोरोना चाचणी करण्यावर पालिका प्रशासन जोर देणार असून आज, बुधवारपासून तशा चाचणी केल्या जाणार आहेत.
कोल्हापुरातील व्यापारी संघटनांनी शहरातील सरसकट सर्वच व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी म्हणून जोरदार मागणी केली होती. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. अनेक प्रयत्न केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून तशी परवानगी दिली आहे. परंतु ती प्रायोगिक तत्त्वावर पाच दिवसांकरिता आहे. या पाच दिवसांत जर कोरोना संसर्ग वाढला तर पुन्हा निर्बंध लादले जाऊ शकतात.
शहर अनलॉक होत असताना व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी कोरोनासंदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातील, अशी ग्वाही प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे या गोष्टीवर कटाक्षाने लक्ष दिले आहे. नियम पाळले जात आहेत का, प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत का, याची तपासणी केली जात आहे. परंतु दोन दिवसांत रस्त्यावर झालेली गर्दी पाहून महापालिका प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना या गर्दीवर नियंत्रण राखण्याच्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच बाजारपेठेतील विक्रेते, फेरीवाले, व्यापारी, दुकानदार यांच्या कोरोना चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागीय कार्यालयाच्या अखत्यारित अशा चाचण्या केल्या जाणार आहेत. महापालिकेची पथके बाजारपेठेत जाऊन व्यवसायाच्या ठिकाणी या चाचण्या करणार आहेेत.
शहरात २५१० कोरोना बाधितांवर उपचार -
कोल्हापूर शहरात सध्या २५१० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये १२९९ पुुरुष तर, १२११ महिलांचा समावेश आहे. ० ते ५ वयोगटातील २९ बालकांसह १८ वर्षांखालील १८७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.