कोरोना निर्बंधामुळे प्रचाराचा सोशल मीडियावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:51 IST2021-09-02T04:51:01+5:302021-09-02T04:51:01+5:30
बेळगाव महापालिका निवडणूक रिंगणात ३८५ उमेदवार असून, सर्वांनीच प्रचारासाठी कंबर कसली आहे. कोरोनाची धास्ती आणि वीकेंड कर्फ्यू अशा दोन्ही ...

कोरोना निर्बंधामुळे प्रचाराचा सोशल मीडियावर भर
बेळगाव महापालिका निवडणूक रिंगणात ३८५ उमेदवार असून, सर्वांनीच प्रचारासाठी कंबर कसली आहे. कोरोनाची धास्ती आणि वीकेंड कर्फ्यू अशा दोन्ही अडचणींवर मात करून उमेदवार आणि त्यांचे समर्थक प्रचाराची कसरत करताना दिसत आहेत. निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी उमेदवारांना केवळ सात दिवसांचा कालावधी मिळाला होता. कोरोना मार्गदर्शक सूचीच्या निर्बंधांमुळे या कालावधीत प्रचारासाठी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात येत आहेत. काही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या दुसऱ्या दिवसापासून मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यास प्रारंभ केला होता. यावेळी बऱ्याच उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला असून, विविध प्रकारच्या क्लृप्त्या प्रचारासाठी वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यंदा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, आम आदमी आदी राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांची भर पडली असल्याने अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी ज्यादा मेहनत घ्यावी लागत आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी प्रथमच बेळगावात राष्ट्रीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी पहावयास मिळाली. कॉंग्रेसतर्फे बेळगावात केपीसीसी अध्यक्ष डी.के. शिवकुमार, माजी मंत्री एम.बी. पाटील यांच्यासह आमदार आणि माजी खासदारांनी आयोजित निवडणूक सभा समारंभ आणि कार्यक्रमात भाग घेतला. त्याचप्रमाणे भाजपतर्फे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री शशिकला जोल्ले, खासदार मंगल अंगडी, खासदार इराण्णा कडाडी यांच्यासह आमदारांनी बैठका, सभा आणि पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. यातून उभय पक्षांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. प्रचारासाठी सोशल मीडियाचा आधार घेणाऱ्या भाजपने प्रामुख्याने मराठी मते कशी विभागली जातील यावर भर दिला आहे. यासाठी त्यांचे जिल्हास्तरीय कानडी नेते कामाला लागले आहेत. काँग्रेसला उमेदवारच मिळालेले नाहीत. त्यांनी जवळपास ४९ प्रभागांमध्ये आपले उमेदवार दिले असले तरी बहुतांश उमेदवार हे उर्दू अथवा कन्नड भाषिक आहेत. मात्र व्होट बँक जिथे आहे त्या ठिकाणी त्यांनी प्रचारावर जोर दिला आहे. तथापि भाजपप्रमाणे काँग्रेसने मात्र महापालिका ताब्यात घेण्याचा कधीच दावा केलेला नाही. त्यांची प्रारंभापासूनच उर्दू भाषिकांवर भिस्त आहे. त्यामुळे किमान १५ नगरसेवक निवडून येतील यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
आम आदमी, एमआयएम, एसडीपीआय हे नवे पक्षदेखील यावेळी महापालिका निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आम आदमी पक्षानेदेखील निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. एमआयएमचे काही मोजकेच उमेदवार असले तरी त्यांच्या प्रचारासाठी खुद्द एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवैसी प्रचारासाठी बेळगावला येऊन गेले आहेत. दरम्यान, आज जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस होता, उद्या बुधवारी (दि. १) सकाळी ७ पासून जाहीर प्रचार करता येणार नाही.