कोरोना, मोबाइलवेडाने उडविली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST2021-06-27T04:17:44+5:302021-06-27T04:17:44+5:30

कोल्हापूर : वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन अभ्यास, दिवसभराचा रिकामा वेळ; पण तुलनेत काम कमी, घरात बंदिस्त असल्याने आळसावलेपण, मग ...

Corona, Mobileveda blown sleep | कोरोना, मोबाइलवेडाने उडविली झोप

कोरोना, मोबाइलवेडाने उडविली झोप

कोल्हापूर : वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन अभ्यास, दिवसभराचा रिकामा वेळ; पण तुलनेत काम कमी, घरात बंदिस्त असल्याने आळसावलेपण, मग वेळ घालवण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त वेळ टीव्ही व मोबाइलवर घालवणे या प्रकारांमुळे गेल्या दीड वर्षात घराघरातील लहान मुलांपासून नोकरदार, वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांची झोप उडाली आहे. काऊच पोटॅटोसारखी (सोफ्यात बसलेले बटाटे) अवस्था होऊन अनेक जणांना निद्रानाश जडला आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये सुरू झालेल्या कोरोनाने माणसाच्या जीवनशैलीची पार दाणादाण उडवली आहे. लहान मुलांपासून, तरुणाई, नोकरदार, कामगार, व्यावसायिक, वयोवृद्ध अशा सगळ्याच घटकातील नागरिकांना घरात बंदिस्त केले आहे. मॉर्निंग वॉकपासून ते वेगवेगळ्या कामानिमित्त दिवसभर गुंतून राहण्याची सवय असतानाच अचानकच काहीच न करता घरात बसून राहावे लागत आहे. वर्क फ्रॉम होमने दिवस आणि रात्रीत फरक उरला नाही. ऑनलाइन अभ्यासाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मोबाइल बघण्याचे व्यसन लागले आहे. शरीराला व्यायाम नाही, बुद्धीला खुराक नाही, घराबाहेर पडून काही करायची सोय नाही, मग दिवसभर टीव्ही नाही तर मोबाइल बघत बसणे या उद्योगामुळे रात्री लवकर झोप येत नाही आणि आली तर व्यवस्थित लागत नाही, अशा निद्रानाशाच्या तक्रारी वाढल्या आहेत.

झोप का उडते?

-प्रमाणापेक्षा जास्त मोबाइल व टीव्ही पाहणे.

-नियमित होणारी शरीराची हालचाल थांबणे.

-व्यायामाचा अभाव

-ताणतणाव, अस्वस्थ मन, अनामिक भीती

-या परिस्थितीत आपण काहीच करू शकत नाही ही हतबलता.

-----

झोप किती हवी?

-नवजात बाळ : १६ ते १८ तास

-एक ते पाच वर्षे : १० ते १२ तास

-शाळेत जाणारी मुले : ८ ते १० तास

-२१ ते ६० वर्षे : ६ ते ८ तास

--

झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम

-मानसिक ताणतणाव

-मेंदूची निष्क्रियता

-नकारात्मक विचारांचे थैमान

-पित्त, अपचन, गॅसेसच्या तक्रारी

-दिवसभर आळसावलेपण, नैराश्य.

- रक्तदाब, मधुमेह अशा आजारांची तीव्रता वाढते.

-अशा मानसिकतेमुळे कोणत्याही आजाराचे पटकन संक्रमण.

--

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको

आपल्याला निद्रानाश झाला आहे की, दुपारी झोपल्याने रात्री झोप येत नाही, हे तपासा. दुपारी झोपल्यामुळे किंवा आळसामुळे झोप येत नसेल तर आपला दिनक्रम बदला; पण झोप येत नाही म्हणून स्वत:हून झोपेची गोळी घेऊ नका. या गोळीमुळे मेेंदूतील सर्व क्रिया त्या काळापुरत्या बंद पडतात, त्याचे पुन्हा दुष्परिणाम होतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नका.

--

चांगली झोप यावी म्हणून

-किमान एक तास चलपद्धतीचे व्यायाम किंवा योगासन करा. त्यांची गती वाढवा

-कॅरम, पत्ते, बुद्धिबळसारखे खेळ खेळा.

-वाचन, गाणी ऐकणे असे छंद जोपासा.

-कायम सकारात्मक विचार करा.

-दिवसभर स्वत:ला क्रिएटिव्ह कामात गुंतवून ठेवा.

---

झोप व्यवस्थित लागायची असेल तर सर्वात आधी आपला स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे. रोज किमान एक तास व्यायाम, दिवसभर स्वत:ला क्रिएटिव्ह कामात गुंतवून ठेवणे, अगदीच काही नसेल तर घरकामात मदत करणे, मुलांना नवनवीन गोष्टी शिकवणे, त्यांच्यासोबत क्वालिटी टाइम घालवणे, अशा अनेक गोष्टी तुम्ही करू शकता. दिवस कामात आणि व्यस्त गेला की रात्री शांत झोप येते.

-डॉ. शुभदा दिवाण (फॅमिली डॉक्टर, समुपदेशक)

--

-----

--

Web Title: Corona, Mobileveda blown sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.