कोरोनामुळे लहान मुले झाली ‘मोटू’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:25+5:302021-07-05T04:15:25+5:30
कोल्हापूर : सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लहान मुलांच्या शाळा बंद आहेत. त्यांना मैदानावर खेळायला जाण्यावर बंधने आली ...

कोरोनामुळे लहान मुले झाली ‘मोटू’!
कोल्हापूर : सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लहान मुलांच्या शाळा बंद आहेत. त्यांना मैदानावर खेळायला जाण्यावर बंधने आली आहेत. त्यांना घरी बसून मोबाईलवर शिक्षण घ्यावे लागत. त्यांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे या मुलांच्या वजनात वाढ होत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी कोल्हापुरातील पालक आपल्या मुलांना घराबाहेर सोडण्यास तयार नाहीत. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिक्षण असो की, खेळणे हे घरातच करण्यासाठी पालकांकडून भर दिला जात आहे. त्यातून साहजिकच मुलांच्या शारीरिक हालचाल कमी झाल्या आहेत. त्यांच्या खाण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांच्यामध्ये स्थूलता वाढत आहे. त्यातून पाठदुखीसह स्थूलतेशी निगडित तसेच रक्तदाब वाढणे, मधुमेह, हृदयाशी संबंधित आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. ते टाळून मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप, व्यायाम या त्रिसूत्रीनुसार पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
चौकट
वजन वाढले कारण
घरातून बाहेर जाता येत नसल्याने आणि ऑनलाईन शिक्षणाने स्क्रीन टाईम वाढल्याने मोबाईल घेऊन एकाच ठिकाणी दोन ते तीन तास बसून राहण्याचे मुलांचे प्रमाण वाढले आहे. सायकलिंग आणि मैदानी खेळ थांबल्याने शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. घरातच असल्याने त्यांचे खाणेही वाढले आहे. या सर्व कारणांनी मुलांचे वजन वाढले आहे.
चौकट
ही घ्या काळजी
१) पालकांनी मोबाईल, लॅॅपटॉप, टीव्ही आदींवरील मुलांचा स्क्रीन टाईम कमी करावा.
२) फास्ट फूडऐवजी त्यांना घरगुती आणि योग्य आहार द्यावा.
३) दोरी उड्या, उठाबशा, रस्सीखेचीसह शालेय कवायतीमधील प्रकार मुलांकडून करून घ्यावे.
४) मुलांना योगासने करण्यास प्रवृत्त करावे.
५) मुलांचा मानसिक तणाव कमी करण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी संवाद वाढवावा.
लहान मुलांचे डॉक्टर म्हणतात
कोरोनामुळे घरातून बाहेर जात येता नसल्याने मुलांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. शारीरिक हालचाल कमी झाल्याने आणि खाणे वाढल्याने अनेक मुलांचे वजन वाढत आहे. दोन वर्षांवरील काही मुलांचे तीन ते पाच किलो इतके वजन वाढले आहे. नैराश्यामुळे काही मुलांचे वजन कमी झाले आहे. मुलांमध्ये वजनाचे असंतुलन झाल्याचे दिसत आहे. त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पालकांनी त्यांना योग्य आहार द्यावा. त्यांची पुरेशी झोप होवू द्यावी. त्यांचा व्यायाम करून घ्यावा.
-डॉ. मोहन पाटील, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ
शारीरिक हालचाल कमी झाल्याने मुलांमध्ये स्थूलता वाढत असून त्याच्या निगडित विकार त्यांच्यामध्ये उद्भवत आहे. ते टाळण्यासाठी पालकांनी त्यांना योग्य आहार द्यावा. घराचे टेरेस, अंगणात घरगुती खेळ घ्यावेत. त्यांचा स्क्रीन टाईम कमी करावा. त्यांना फास्टफूड देवू नये.
-डॉ. अमर नाईक, बालरोगतज्ज्ञ
मुले टीव्ही, मोबाईल सोडतच नाहीत
सलग दुसऱ्या वर्षी कोरोना असल्याने माझ्या दोन्ही मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना घरातून बाहेर सोडता येत नाही. त्यामुळे मोबाईल, टीव्ही सोडतच नाहीत. ही नवी समस्या निर्माण झाली आहे.
- रूपाली हेंबाडे, पालक.
माझी मुलगी चौथीमध्ये आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे तिला मोबाईलची सवय लागली आहे. त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर होत आहे. तिचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी तिला थोडे घरगुती खेळ, शाळेतील कवायतीचे प्रकार करायला लावत आहोत.
- अनिल पोतदार, पालक.
040721\04kol_1_04072021_5.jpg
डमी (०४०७२०२१-कोल-स्टार ८७८ डमी)