कोरोनाची धास्ती अन् गावाबाहेर वस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:39 IST2021-05-05T04:39:58+5:302021-05-05T04:39:58+5:30
सतीश नांगरे लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारुण : जीवनावश्यक काहीच नाही. खरंतर जीवनचं आवश्यक आहे. ते जगायचं असेल तर कोरोना ...

कोरोनाची धास्ती अन् गावाबाहेर वस्ती
सतीश नांगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तूर-वारुण : जीवनावश्यक काहीच नाही. खरंतर जीवनचं आवश्यक आहे. ते जगायचं असेल तर कोरोना काळात दक्षता ही घ्यायला हवी. मात्र आपल्या आजूबाजूला जर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली तर करायचे काय? दक्षता घ्यायची किती? यावर एकच उपाय तो म्हणजे विलगीकरण. या विचाराने गावातील काही नागरिकांनी थेट गावाबाहेरील शेतशिवारात पाल ठोकून राहण्याचा मार्ग निवडला आहे.
शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) परिसरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोनाच्या धास्तीत भर पडली आहे. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या शेजाऱ्यांनी आपला मोर्चा आता शेत-शिवार व माळरानाकडे वळविला आहे.
शित्तूर-वारुण गावामध्ये सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४ आहे. उखळूमध्ये ३, शिराळे-वारुण १, सोंडोली ४, मालेवाडी ४, जांभूर २, मालगाव ३, कांडवन ३ अशी एकूण २४ कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे.
कोरोना या संसर्गजन्य महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनामुळे तालुक्यात एक दाम्पत्य दगावले असल्याची व दोन लहान मुले पोरकी झाल्याची घटना मागच्याच आठवड्यात घडली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात रोज साधारण ३० ते ३५ जणांचा मृत्यू होत आहे.
आपल्या जवळच्या, शेजारच्या, गल्लीतील एखाद्या व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली असेल तर सुरक्षिततेसाठी सर्वप्रथम स्वॅब चाचणी करून व संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आपल्या कुटुंबाला काही दिवसांसाठी काय होईना परंतु विलगीकरणात ठेवण्याची मानसिकता सध्या जोर धरू लागली आहे.
संजय निवडुंगे (शेतशिवारात पाल ठोकून राहिलेले नागरिक)
आई वडिलांचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक आहे. घरी चार लहान मुले आहेत. आमच्या सर्वांचे कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी आमच्या मुळे कोणाला त्रास होऊ नये व कोरोनाची संसर्ग साखळी टाळता यावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही कुटुंबासह शेत-शिवारात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
नीता पाटील (सरपंच-शित्तूर-वारुण)
शित्तूर-वारुण आणि परिसरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे गावामध्ये दूधसंस्था, मेडिकल व दवाखाने वगळता सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू असणारी दुकाने उद्यापासून पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. शित्तूर-आरळा हा वाहतुकीचा पूलही उद्यापासून पूर्णता बंद करण्यात येत आहे.
फोटो:
शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) येथे गावच्या वेशीबाहेरच शेतशिवारात पाल ठोकून स्वतःचे विलगीकरण केलेले संजय निवडुंगे यांचे कुटुंब
(छाया : सतीश नांगरे)