मजरे कासारवाडा येथे कोरोनाने आठवड्यात तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:04+5:302021-07-18T04:18:04+5:30
तुरंबे : ग्रामीण भागातही कोरोनाने मृत होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. मजरे कासारवाडा येथील भाच्यासह चुलत मामा आणि त्यानंतर ...

मजरे कासारवाडा येथे कोरोनाने आठवड्यात तिघांचा मृत्यू
तुरंबे : ग्रामीण भागातही कोरोनाने मृत होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. मजरे कासारवाडा येथील भाच्यासह चुलत मामा आणि त्यानंतर एका वृद्धासह एकाच आठवड्यात तिघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता कमिटीने आज रविवारपासून गावात आठ दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. गावाबाहेरील व्यक्तींना गावात येण्या-जाण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे.
राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा येथील रुग्ण संख्या आठवड्यामध्ये सहाच्या आसपास होती. यातील दस्तगीर ऊर्फ पिंटू रमजान शानेदिवाण (३५) याचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यानंतर त्यांचे चुलत मामा दस्तगीर बाबालाल जमादार (५४) आणि राऊ गोपाळ चव्हाण (७२) यांचा एकाच दिवशी लागोपाठ मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दस्तगीर शानेदिवाण आणि दस्तगीर जमादार यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. शानेदिवाण अत्यंत मनमिळाऊ होता. लोकांची सरकारी दप्तरी असणारी कामे, दाखले या बाबतीत तो सर्वांना उत्स्फूर्तपणे मदत करायचा तर दस्तगीर जमादार हे हरहुन्नरी व कष्टाळू होते. संसर्ग रोखण्यासाठी गावातील सर्व व्यवहार पुढील आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक दक्षता कमिटीने घेतला आहे.