कोरोनाने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:46+5:302021-06-18T04:17:46+5:30
सडोली (खालसा) : गाडेगोंडवाडी (ता. करवीर) येथील दोन सख्ख्या भावांचा एक महिन्याच्या आत कोरोनाने मृत्यू झाला. पंडित रामचंद्र ...

कोरोनाने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
सडोली (खालसा) : गाडेगोंडवाडी (ता. करवीर) येथील दोन सख्ख्या भावांचा एक महिन्याच्या आत कोरोनाने मृत्यू झाला. पंडित रामचंद्र मेटील (वय ६३) व निवृत्ती रामचंद्र मेटील (वय ६०) अशी त्यांची नावे आहेत. दोन कर्त्या पुरुषांच्या मृत्यूने मेटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
एक महिन्यापूर्वी गाडेगोंडवाडी (ता. करवीर) गावासह परिसरात कोरोनाचा कहर वाढला होता. मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढल्याने मेटील परिवारात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यातून पंडित, निवृत्ती मेटील या दोघा भावांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु पंडित मेटील यांची तब्येत खालावल्याने चार दिवसांत त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर निवृत्ती मेटील हेही एक महिना कोरोनाशी झुंज देत होते. परंतु त्याची झुंज अपयशी ठरल्याने अखेर त्यांचा मृत्यू झाला. निवृत्ती मेटील यांनी सरपंचपदाच्या काळात गावात आदर्शवत विकासकामे केली होती. तसेच लोकसहभागातून प्राथमिक शाळा सर्वांग सुंदर बनवली. हनुमान सहकार समुहाच्या माध्यमातून सामान्यांना आधार दिला. ते राम पतसंस्था वाशीमध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून कार्यरत होते. भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी संचालक हिंदूराव मेटील यांचे ते बंधू होत.
१७ पंडित मेटील
१७ निवृत्ती मेटील