तालुक्यातील २२ गावे कोरोना हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:48+5:302021-07-14T04:27:48+5:30
तालुक्यातील २० पेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेली २२ गावे आरोग्य विभागाने हॉटस्पॉट घोषित केली आहेत. या गावांमध्ये कडक निर्बंध लावण्यात ...

तालुक्यातील २२ गावे कोरोना हॉटस्पॉट
तालुक्यातील २० पेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेली २२ गावे आरोग्य विभागाने हॉटस्पॉट घोषित केली आहेत. या गावांमध्ये कडक निर्बंध लावण्यात यावेत, त्यांचे काटेकोर पालन करण्यात यावे अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत.
हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली, माणगाववाडी, अतिग्रे, कोरोची, किणी, हेरले, रुई, इंगळी, पु. शिरोली, रुकडी, रेंदाळ, टोप, संभापूर, मिणचे, सावर्डे, तासगाव, नरंदे, कुंभोज, मजले, भादोले, लाटवडे, घुणकी ही २२ गावे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.
या गावातील कोरोना दक्षता समितीने नियमांचे काटेकोर पालन करावे. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग यासह सरकारी कर्मचारी यांनी गावामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन होते का यासाठी प्रयत्न करून कडक निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यात जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, दोन मीटरचे अंतर या त्रिसूत्रीचा वापर काटेकोरपणे अंमलात आणावा असे अवाहन केले आहे.
तालुक्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या २२ पैकी चार-पाच गावे सोडली, तर इतर गावे दहा हजार लोकवस्तीच्या पुढील आहेत. ६० गावांपैकी एकमेव लक्ष्मीवाडी गाव कोरोनामुक्त झाले आहे. इतर ३७ गावांमध्ये १ ते २० रुग्ण असल्याने त्यांना थोडी मोकळीक दिली जात आहे. जी गावे हॉटस्पॉट आहेत त्या गावामध्ये आरटीपीसीआर चाचण्यात वाढवून गावामध्ये फक्त मेडिकल, दवाखाने वगळता सर्व व्यवहार किमान दहा दिवसांसाठी बंद करावेत, बाहेरील व्यक्ती गावात येण्यास प्रतिबंध करावा, गावातील लोकांना बाहेर पडू देऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, जे कामानिमित्त बाहेर पडतील त्याच्या चाचण्या करून मोकळीक देण्यात यावी. लसीकरण वाढवून आपले गाव हॉटस्पॉटमधून बाहेर पडू शकेल याची खबरदारी नागरिकांनीच घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल आहे.