शिरोळ तालुक्यात कोरोना वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST2021-04-27T04:24:03+5:302021-04-27T04:24:03+5:30
संदीप बावचे जयसिंगपूूर : शिरोळ तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असून दररोज रुग्णसंख्येचा आलेख वाढतच चालला आहे. सद्य:स्थितीत तालुक्याची एकूण ...

शिरोळ तालुक्यात कोरोना वाढतोय
संदीप बावचे
जयसिंगपूूर :
शिरोळ तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असून दररोज रुग्णसंख्येचा आलेख वाढतच चालला आहे. सद्य:स्थितीत तालुक्याची एकूण कोरोना बाधितांची संख्या साडेचारशेवर पोहोचली आहे. आतापर्यंत ३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. लसीकरणासाठी केंद्रावर रांगा लागत असल्यातरी कमी प्रमाणात डोस उपलब्ध होत असल्याने अडचणी येत आहेत.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाडसह ग्रामीण भागात कोरोना विषाणूने पुन्हा हातपाय पसरले असून सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.
तालुक्यात ३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे तर बाधितांची संख्या साडेचारशेवर पोहोचली आहे. गतवर्षी चार हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.
शिरोळ तालुक्याची लोकसंख्या चार लाखाच्या घरात आहे. अँटिजन तपासणीबरोबरच स्वॅब संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. तालुक्यात जयसिंगपूर, उदगांव, शिरोळ, कुरुंदवाड याठिकाणी रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. शिवाय बरे होण्याचा दर चांगला असला तरी बाधित रुग्णांचे प्रमाण चिंता वाढविणारे आहे. त्यामुळे खबरदारी हाच उपाय बनला आहे. सकाळी सात ते अकरा अत्यावश्यक सुविधा सुरू केल्या असल्यातरी गर्दी थांबायला तयार नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट कसे दूर होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
------------------------
सद्य:स्थितीत रुग्ण -४५५
तालुक्यात एकूण शहरे तीन, गावे ५३, मृत्यू, ०३
नऊ गावात कोरोनाचे रुग्ण नाही
आगर येथे -८९ व उदगांव येथे १०० बेडचे कोविड सेंटर
लसीची उपलब्धता महत्त्वाची
शिरोळ तालुक्यात लसीकरण केंद्रे सुरू आहेत. मात्र, साठ्याअभावी अडचणी येत आहेत. लसीकरणासाठी नागरिक पहाटेपासून रांगा लावत आहेत. त्यामुळे लसींचा योग्य साठा उपलब्ध होणे गरजेचे आहे. १ मे पासून १८ वर्षांरील व्यक्तींना लसीकरण सुरू होणार असल्याचे शासनाने सांगितले आहे
त्यामुळे लसीचा साठा महत्त्वाचा बनला आहे.