corona cases in kolhapur : मतदारांसाठी जोडण्या, रुग्ण मात्र वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:22 AM2021-05-12T10:22:15+5:302021-05-12T10:26:34+5:30

CoronaVIrus Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत राजकीय हित होते म्हणून त्याच्या मतदारांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून सगळ्या जोडण्या लावणाऱ्या आमदार-खासदारांनी कोरोनाच्या संकटाच्या काळात मात्र गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्याचे संतापजनक चित्र कोल्हापुरात अनुभवण्यास येत आहे.

Corona cases in Kolhapur: Connections for voters, but patients on the air | corona cases in kolhapur : मतदारांसाठी जोडण्या, रुग्ण मात्र वाऱ्यावर

corona cases in kolhapur : मतदारांसाठी जोडण्या, रुग्ण मात्र वाऱ्यावर

Next
ठळक मुद्देमतदारांसाठी जोडण्या, रुग्ण मात्र वाऱ्यावरसंकटाच्या काळात आमदार-खासदारांनी जनतेला सोडले वाऱ्यावर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत राजकीय हित होते म्हणून त्याच्या मतदारांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून सगळ्या जोडण्या लावणाऱ्या आमदार-खासदारांनी कोरोनाच्या संकटाच्या काळात मात्र गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्याचे संतापजनक चित्र कोल्हापुरात अनुभवण्यास येत आहे.

ऑक्सिजन मिळत नाही, रेमडेसिविरसाठी तगमग, रुग्णालयांत बेड मिळावा यासाठी नातेवाईकांची प्रचंड धावपळ सुरू असताना त्यांना धीर द्यायला एकही माईचा लाल पुढे येताना दिसत नाही. जिल्ह्यातील सगळे आमदार-खासदार मातब्बर आहेत परंतु तरीही त्यांना तालुकास्तरांवर स्वत:च्या हिमतीवर काहीच व्यवस्था उभी केलेली नाही. हे लोक काय मग माणसे मेल्यावर नातेवाईकांच्या पुढ्यात बसून सांत्वन करण्यातच धन्यता मानणार आहेत का, अशी विचारणा होऊ लागली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार नीलेश लंके गेली महिनाभर कोरोना रुग्णांना आधार देण्यासाठी धडपडत आहेत. कोरोना केंद्रात मुक्काम ठोकून ते रुग्णसेवा करत आहेत. गेल्यावर्षी त्यांनी एक हजार रुग्णांची सोय होईल, असे कोविड सेंटर उभारले होते. यंदाही त्यांनी अकराशे बेडचे सेंटर सुरू केले आहे. स्वत:ला कोरोनाचा संसर्ग होईल याची कोणतेही तमा न बाळगता हा बहाद्दर आमदार घरदार सोडून रुग्णसेवेत विलीन झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मात्र असा प्रयत्न करताना अनुभव येत नाही. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर हे सरकारी यंत्रणांच्या बैठका घेऊन यंत्रणा जरूर सक्रिय करत आहेत परंतु तेवढेच पुरेसे नाही. गेल्यावर्षी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मारून यंत्रणा राबविली होती तसे प्रयत्न यावर्षी लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरही होताना दिसत नाहीत. कोल्हापूरचा मृत्युदर देशात सर्वाधिक आहे.

रोज किमान ५० जणांचा मृत्यू होत आहे. सरासरी रोज एक हजार नवे कोरोनाबाधित होत आहेत. जिल्ह्यातील मृतांमध्ये ५० वर्षाच्या आतील व्यक्तींची संख्या जास्त आहे. कुटुंबाचे आधार कोरोनाने हिरावून घेतले जात आहेत. लोक निराधार होत आहेत. फक्त कोरोनाबाधित झालेला माणूस आजूबाजूची स्थिती पाहून आपण यातून वाचू शकत नाही, असे म्हणून धीर सोडत आहे व कोरोनापेक्षा भीतीनेच त्याचा मृत्यू होत आहे; परंतु आपण त्याला धीर देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून काय करताना दिसत नाही.

साधे उदाहरण लसीकरणाचेच घ्या. जिल्ह्यातील लसीकरणास पात्र असलेली लोकसंख्या ३४ लाख आहे. १० मेपर्यंत यापैकी ८ लाख ७५ हजार जणांनी पहिला डोस घेतला आहे. लोक पहाटे पाच वाजल्यापासून केंद्रांवर रांगा लावत आहे. लस येणार आहे की नाही हे खात्रीशीर सांगता येत नाही. भली मोठी रांग असताना अचानाक लस संपली, असे जाहीर करण्यात येते. मोबाईलवर नोंदणी करा म्हणून सांगण्यात येते परंतु त्या ॲपवर गेले तर पुढच्या तारखा बुक्ड म्हणून नोंदणीच होत नाही. लस मिळणे यालासुद्धा दिव्य पार पाडावे लागते.

महाराष्ट्राच्या राज्य सरकारमधील सत्तेत दबाव असलेले तब्बल तीन मंत्री कोल्हापूरचे आहेत. त्यांना लस उपलब्ध करून देण्यासाठीही काही व्यवस्था करता येत नसेल तर त्याहून दुसरे काही वाईट असू शकत नाही. विद्यमान लोकप्रतिनिधींची बेफिकीरी आहेच परंतु त्यांच्या विरोधात लढलेले ते तरी कुठे जनतेच्या सेवेत आहेत असेही दिसत नाही. सगळयांनीच प्रशासन काय करते ते बघत राहण्याची काठावरील भूमिका स्वीकारली आहे. अशोक रोकडे, संताजी घोरपडे अशांनी गेल्यावर्षी व यंदाही कोविड सेंटर सुरू करून रुग्णांची सोय करण्याची धडपड केली आहे.

जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे यांनी मुमेवाडी (ता. आजरा) येथे चक्क वीज केंद्रात कोविड सेंटर सुरू केले असून लोकांची सोय केली आहे. हातात झाडू घेऊन ते अनेकदा स्वच्छता करत आहेत. जिल्हा परिषदेचा एक साधा सदस्य हे करू शकत असेल तर मग इतरांना ते का जमत नाही, असा सवाल लोकांच्या मनात आहे. कोल्हापूरला अशा सामाजिक कामाची व मदतीसाठी धावून जाण्याची मोठी परंपरा आहे. तुुम्ही फक्त पुढाकार घेण्याची गरज आहे. तालुकास्तरावर अशी केंद्रे सुरू झाली तर जिल्ह्याच्या ठिकाणी येणारा ताण कमी होवू शकतो. रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ व भीतीही कमी होऊ शकते.

आपले आमदार-खासदार इतके मातब्बर आहेत की त्यांनी मनात आणले तर कोविड सेंटरच काय काही दिवसांत ते कोविड रुग्णालय उभा करू शकतील. त्यापैकी अनेक जणांकडे साखर कारखाना व अन्य संस्थांचे जाळे आहे त्याचा वापर करून लोकांच्या मदतीला धावून जाण्याचे सोडाच आपली जनता सध्या कोणत्या संकटातून, अडचणीतून जात आहे याचे जराही सोयरसुतक त्यांना नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे.

असे आहेत आपले आमदार

  • हसन मुश्रीफ
  • सतेज पाटील
  • राजेंद्र यड्रावकर
  • प्रकाश आवाडे,
  • पी. एन. पाटील
  • विनय कोरे
  • प्रकाश आबिटकर
  • राजेश पाटील
  • चंद्रकांत जाधव
  • ऋतुराज पाटील
  • राजूबाबा आवळे
  • जयंत आसगांवकर
     

खासदार असे

  • संभाजीराजे छत्रपती
  • संजय मंडलिक
  • धैर्यशील माने

Web Title: Corona cases in Kolhapur: Connections for voters, but patients on the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.