कोरोनाचे नियम तोडले, ४० लाख मोजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST2021-04-28T04:25:25+5:302021-04-28T04:25:25+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरवासीयांना एक नियमावली घालून दिली आहे; पण नियम पाळतील तर मग कोल्हापूरकर ...

कोरोनाचे नियम तोडले, ४० लाख मोजले
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरवासीयांना एक नियमावली घालून दिली आहे; पण नियम पाळतील तर मग कोल्हापूरकर कसले..? गेल्या अडीच महिन्यांत अशा नियम तोडणाऱ्या ३० हजार २२१ नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळले नाहीत म्हणून महापालिका प्रशासनाने दंड करून त्यांच्याकडून ४० लाख ५६ हजार २२२१ रुपये वसूल केले. सारे जग ओरडून सांगत असतानाही लोक तोंडावर मास्क लावत नाहीत याचेही प्रत्यंतर या कारवाईतून आले आहे. कारण मास्क लावला नाही म्हणून सर्वाधिक २७ हजार ३९५ लोकांना दंड झाला आहे.
महानगरपालिका प्रशासन कोरोना संसर्गाशी गेल्या वर्षभरापासून लढत आहे. हा संसर्ग रोखण्यास प्रशासन, औषधोपचार यासह कोल्हापूरकरांचे मोठे सहकार्य अपेक्षित आहे. म्हणून नागरिकांना समाजावून सांगितले, जनजागृती केली. तरीही खबरदारी घेतली जात नाही म्हटल्यावर नियम कडक केले आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली.
सार्वजनिक ठिकाणी फिरताना नागरिकांनी महानगरपालिकेने केलेले नियम पाळावेत, असे सांगितल्यानंतर सुद्धा काही नागरिक अत्यंत बेफिकीर वागत असल्याचे दिसून येत आहे. या नियमांचे पालन होते की नाही, पालन करत नसतील तर संबंधित नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पाच पथके तयार केली. फेब्रुवारीपासून त्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे.
फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलच्या २६ तारखेपर्यंत महानगरपालिकेच्या पाच पथकांनी तब्बल ३० हजार २२१ नागरिकांना दंडाचा दणका दिला. नियम तोडले म्हणून त्यांना जागेवर दंडाच्या पावत्या हातात दिल्या. त्यांच्याकडून ४० लाख ५६ हजार २२१ इतका दंड वसूल केला. दंडाची रक्कम आणि केसेस यांचे आकडे म्हणजे कोरोनासारख्या महामारीच्या काळात नागरिक किती बेफिकीर वागतात याचे उदाहरण आहे. नुसते बेफिकीर नाहीत तर स्वत:च्या कुटुंबाला देखील अडचणीत आणत आहेत. कोरोनाचा संसर्ग, मृत्यूचे प्रमाण वाढत असताना तरी नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे.
कारवाईचा प्रकार केसेस दंडाची रक्कम
- विनामास्क - २७, ३९५ : २७, ३९,५००
- सोशल डिस्टन्स १५१४ : १२, ७६,५००
- विना हॅन्डग्लोज - ३२ : ८०००
- रात्री ९ नंतर व्यवसाय- २ : २०००
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे- १२७८ : १२७८०