कोरोनामुळे चोरटेही झाले घरबंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST2021-04-30T04:29:34+5:302021-04-30T04:29:34+5:30

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात संचारबंदी पुकारल्याने घराबाहेर कोणीही न पडताच सारे कुटुंबच घरात राहिले. चोरट्यांनाही चोऱ्या करण्यात मर्यादा ...

Corona also caused burglary! | कोरोनामुळे चोरटेही झाले घरबंद !

कोरोनामुळे चोरटेही झाले घरबंद !

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात संचारबंदी पुकारल्याने घराबाहेर कोणीही न पडताच सारे कुटुंबच घरात राहिले. चोरट्यांनाही चोऱ्या करण्यात मर्यादा आल्या. त्यामुळे चोरटेही घरबंद झाल्याची स्थिती आहे. परिणामी दरोडा, जबरी चोऱ्या, घरफोड्यांच्या प्रमाणात घट झाली असली तरीही वाहने चोरीच्या घटनेत मात्र नेहमीपेक्षा कमालीची वाढ झाल्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र आहे.

कोरोना संसर्ग वाढल्याने संचारबंदी पुकारली . नागरिकांना विनाकारण रस्त्यावर फिरण्यास प्रतिबंध केले. परिणामी, नागरिकांनी घरीच थांबून राहणे पसंद केले. कुटुंबाचे सारेच सदस्य घरी राहिल्याने चोरट्यांना ही घरफोडी, जबरी चोऱ्या करण्यात मर्यादा आल्या, परिणामी जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यात चोऱ्याचे प्रमाण घटले आहे. पण चोरट्यांनी दुचाकी वाहने चोरण्याचा मात्र सपाटा लावल्याने दुचाकी चोरीचा आलेख कमालीचा वाढल्याची गंभीर बाब आहे.

पॉईंटर...

- २०१९ मध्ये झालेल्या चोरीच्या एकूण घटना : १५९२

(दरोडा : २८, जबरी चोरी : १५१, घरफोडी चोरी : ३९८, इतर चोरी : १०१५)

- २०२० मध्ये झालेल्या चोरीच्या एकूण घटना : १२८६

(दरोडा : ११, जबरी चोरी : १०८, घरफोडी चोरी : २८७, इतर चोरी : ८८०)

- एप्रिल २०२१ पर्यंत झालेल्या चोरीच्या घटना : ५८०

(दरोडा : ०१, जबरी चोरी : ४२, घरफोडी चोरी : ७८, इतर चोरी : ४५७)

खुनाच्या घटना वाढल्या

संचारबंदीत कौटुंबिक कलह वाढण्याच्या घटना घडल्या तशा खुनाच्या प्रयत्नाच्या ही घटनामध्ये वाढ झाली. २०१९ मध्ये ४८ खुनाच्या घटना घडल्या, तर २०२० मध्ये ४६ घटना घडल्या. जानेवारी ते मार्च २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये पहिल्या तीन महिन्यात ०६ खुनाच्या घटना जादा घडल्या. तर खुनाचे प्रयत्नाच्या घटनात ही वाढ झाली. जानेवारी ते मार्च २०२१ या कालावधीत एकूण १७ खुनाच्या घटनांची नोंद पोलीस दप्तरी आहे.

बलात्कारही वाढले...

संचारबंदीच्या कालावधीत महिला व मुलींवरील बलात्काराचे ही प्रमाण वाढल्याचे पोलीस दप्तरातील नोंदीवरुन दिसून येत आहे. २०१९ मध्ये बलात्काराच्या एकूण १२८ तर २०२० मध्ये ११५ घटना घडल्या. जानेवारी ते मार्च २०२० च्या तुलतेन २०२१ मध्ये पहिल्या तीन महिन्यात तब्बल १२ घटनांची जादा नोंद झाली आहेत. जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यात तब्बल ३९ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.

कोट...

संचारबंदीत सर्व पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी रस्त्यावर तर, नागरिक घरीच राहिल्याने चोरीच्या घटनात घट झाली. पण कौटुंबिक कलहाच्या घटना वाढल्या, महिलावरील अत्याचाराचे ही प्रमाण वाढताना दिसत आहे, त्यामुळे महिलांनी अन्यायाविरुद्ध तक्रारीसाठी धाडसांनी पुढे यावे - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा

Web Title: Corona also caused burglary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.